गेल्या वर्षी मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर हजेरी लावली. जून ते ऑक्टोबपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने विभागातील १९ मोठे प्रकल्प तुडूंब भरले. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवली नाही. आजही काही मोठे प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यावर्षी विभागातील प्रकल्पांत १७२४ दलघमी उपयुक्त जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत ७२७ दलघमी जलसाठा अधिक आहे. मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी पाणी आरक्षित करण्याची प्रशासनाला गरज भासली नाही.
जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गोसेखूर्द टप्पा-१ मध्ये सर्वाधिक १०० टक्के तर वर्धा जिल्ह्य़ातील पोथरा प्रकल्पात सर्वात कमी केवळ ११ टक्के जलसाठा आहे. नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा व सिवनी (म.प्र.) या जिल्ह्य़ात एकूण १९ मोठे प्रकल्प असून त्यांची क्षमता ३६८३ दलघमी एवढी आहे. १९ मे रोजी या प्रकल्पामध्ये १७२४ दलघमी जलसाठा उपलब्ध होता. गेल्यावर्षी याच दिवशी हा जलसाठा ९९७ दलघमी एवढा होता. नागपूर जिल्ह्य़ात पेंच, सूर, नांद, वेणा या नद्यांवर असलेल्या तोतलाडोह प्रकल्पात ५१ टक्के (५४५ दलघमी), कामठी खैरी ९० टक्के, रामटेक ६१ टक्के, वडगाव-नांद २२ टक्के, वेणा २४ टक्के, गोंदिया जिल्ह्य़ातील इटियाडोह प्रकल्पात २३ टक्के, सिरपूर २४ टक्के, पुजारी टोला १९ टक्के, चंद्रपूर जिल्ह्य़ातील आसोलामेंढा प्रकल्पात ४७ टक्के, ईरइ प्रकल्पात ५६ टक्के, गडचिरोली जिल्ह्य़ातील दिना प्रकल्पात ३१ टक्के, वर्धा जिल्ह्य़ातील बोर प्रकल्पात ३७ टक्के, धाममध्ये ३० टक्के, पोथरा ११ टक्के, लोअर वर्धा प्रकल्पात ५० टक्के, भंडारा जिल्ह्य़ातील गोसेखूर्द प्रकल्पात १०० टक्के, बावणथडी प्रकल्पात ५७ टक्के आणि मध्यप्रदेशातील सिवनी येथील वैनगंगा नदीवरील संजय सरोवरात २२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्य़ात एकूण ३१० लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील जलसाठय़ाची क्षमता ४८२ दलघमी आहे. या प्रकल्पांमध्ये १९ मे रोजी २३ टक्के म्हणजेच ११० दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी या सर्व प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के म्हणजे ६८ टक्के होता. यावर्षी हा जलसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत नऊ टक्के अधिक आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठय़ात प्रचंड वाढ झाली. पाऊस कमी पडल्यास उन्हाळ्याच्या सुमारास अनेक प्रकल्पात जमेतेम पाणीसाठा उपलब्ध असतो. त्यामुळे त्या परिसरातील जनतेला पिण्याच्या पाण्याला तसेच गुरांसाठी प्रथम प्राधान्य दिले जाते. म्हणूनच मे महिन्याच्या सुमारास या प्रकल्पातील पाणी उपस्यास जिल्हाधिकारी प्रतिबंध घालतात. परंतु यावर्षी नागपूर विभागात अशी परिस्थिती उद्भवली नाही.
पावसाळा सुरू होण्यास आणखी तीन आठवडे आहे. तोपर्यंत प्रकल्पातील उपलब्ध जलसाठय़ात फारसी घट होणार नाही.