नागपूर-वर्धा रस्ता चौपदरीकरण करून त्यास महात्मा गांधी अहिंसा मार्ग असे नाव देण्यात यावे ही मोहन जोशी यांची मागणी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत मान्य केली. वर्धा येथील सेवाग्राम मधील महात्मा गांधी यांच्या बापूकुटी जीर्णावस्थेत असून तिच्या रक्षणासाठी व व्यवस्थेसाठी शासन कोणती कार्यवाही करणार असा तारांकित प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला होता. तसेच नागपूर-वर्धा रस्ता चौपदरीकरण करून त्यास महात्मा गांधी अहिंसा मार्ग, असे नाव देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
बापूकुटीबाबत शासन स्तरावर उदासिनता असून कुटीच्या संरक्षणाबाबत हेळसांड होत आहे. नांदेड शहराच्या विकासाकरता ज्या प्रमाणे विशेष निधी देऊन नांदेड शहराचा विकास केला त्याच धर्तीवर वर्धा शहराचा पूर्ण विकास करावा. सेवाग्राम परिसरात दरवर्षी तीन लाखाहून अधिक देशी आणि विदेशी पर्यटक भेट देतात. परंतु सेवाग्राम परिसरातील यात्री निवासाची अत्यंत दुरावस्था झाली आहे.
तसेच त्या ठिकाणी भीषण पाणी टंचाई असून त्यासाठी वेगळी नवीन पाण्याची टाकी आणि यात्रेकरूसाठी एक मोठा हॉल यासाठी शासनाकडे २.२६ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन मान्य करेल काय असे अनेक प्रश्न मोहन जोशी यांनी उपस्थित केले होते.         
त्यावर सेवाग्राम आश्रम आणि वर्धा शहराच्या सर्वागिण विकास करण्यासाठी तपशीलवार नवीन प्रस्ताव राज्य सरकारने हाती घेतला आहे.
हा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने राबवला जाईल आणि आमदार मोहन जोशी यांनी ज्या बाबींचा उल्लेख या ठिकाणी केला त्यासर्व बाबी समाविष्ट करून त्यास लागेल तेवढा निधी दिला जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.