एका अल्पवयीन आरोपीने एका ऑटोरिक्षा चालकाचा तर एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराचा दगडाने डोके ठेचून खून केला. शहरातील अनुक्रमे चंद्रमणीनगर व सीताबर्डी या भागात बुधवारी रात्री पावणेअकरा वाजेनंतर या घटना घडल्या. जुन्या वैमनस्यातून या दोन्ही घटना घडल्या.
पहिली घटना चंद्रमणी नगरातील नासुप्र उद्यानात बुधवारी रात्री पावणेअकरा वाजताच्या सुमारास घडली. हेमंत वासुदेव सहारे (रा. वसंतनगर) हे खून झालेल्याचे नाव असून तो ऑटो रिक्षा चालवितो. गुन्हेगारीवृत्तीचा हेमंत हा नेहमी त्याच्या साथीदारांना त्रस्त करीत होता. काल रात्री हेमंच दारू पिऊन आला. त्याने एका पंधरा वर्षांच्या त्याचा साथीदाराला दारू पिण्यास पैसे मागितले. पैसे नसल्याने तो नाही म्हणाला. त्यामुळे हेमंतने त्याला शिवीगाळ केली. हे रोजचे असल्याने बाल आरोपी संतप्त झाला. तो तेथून घरी गेला. काहीवेळो तो परत आला तेव्हा हेमंत नासुप्र बगिचात बसला होता. आरोपी तेथे गेले आणि त्याने हेमंतच्या डोक्यावर काठीचे फटके मारले. काठीटे पाच-सात फटके बसल्याने हेमंतचे डोके फुटले आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर त्याने सिमेंटच्या दगडाने त्याचे डोके ठेचले. तो मेल्याची खात्री झाल्यानंतर हा बाल आरोपी सरळ अजनी पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने हेमंतचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दुसरी घटना सीताबर्डीवरील महाजन मार्केटसमोर बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली. आज सकाळी दुकान उघडायला आलेल्या काही दुकानदारांना तेथे मृतदेह पडलेला दिसला. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. हेमंत उर्फ मनीष परसराम साधवानी (रा. म्हाडा कॉलनी नारा रोड) याचा मृतदेह असल्याचे तेथील दुकानदारांनी ओळखले.  मनीष हातगाडीवर चप्पल-बुट विकतो. त्याच्या शेजारी आरोपी मोनू सोनी व सूमित यादव हे दोघेही हातगाडीवर चप्पल व बुट विकतात. हातगाडीच्या जागेवरून त्यांच्यात  भांडणे व्हायची. काल सायंकाळी त्यांचे भांडण झाले होते, असे पोलिसांना समजले. पोलिसांनी तातडीने एका आरोपीस ताब्यात घेतले. तो सकाळी घटनास्थळी दिसला होता. त्याने काहीच केले नसल्याचे तसेच रात्रभर घरीच सांगितले. तो रात्री घरीच आला नसल्याचे त्याच्या पत्नीने  सांगितले. अखेर त्याने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु केला.