राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्ष परीक्षेच्या ‘मराठी साहित्य’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. चुकांची सीमा ओलांडणाऱ्या या प्रकारामुळे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या एकंदर कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले असून विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल करण्यात आला आहे.
गुरुवारी, ३० मे रोजी बी.ए. द्वितीय वर्षांचा ‘मराठी साहित्य’ विषयाचा पेपर होता. यातील प्रश्नपत्रिका म्हणजे घोडचुकांचा कळस होती. तिसऱ्या प्रश्नात संदर्भासहित स्पष्टीकरण विचारण्यात आलेल्या ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील ओव्यांचा विपर्यास करण्यात आल्याचे दिसून येते. या प्रश्नाच्या गट अ ओवी क्रमांक ‘क’ मध्ये ‘येयापरी जे भक्त’। आपणचे मज ते मी योगमुक्त। असा संदर्भ प्रश्न विचारलेला आहे. या ओवीतील ‘आपणचे’ ऐवजी आणि ‘ते’ ऐवजी ‘तोचि’ योगमुक्त असे हवे होते. संदर्भ ख मधील ‘शशिबिंब दिहे’ या ओळींऐवजी ‘शशिबिंब दिसे’ अशी ओळ हवी होती.
गट ‘ब’ मधील ‘च’ संदर्भ ओवीदेखील पूर्णपणे चुकलेली आहे. यात
‘खडकी जैसे वरिषले । का अग्निभाजी पेरिले। कर्मभानी देखिले। स्वप्न जैसे।
आगा आत्मजेचा विशिं। जैसा जिउ निराभिलाषी तैसा कर्मि अशेषि। निष्काम होये।।
या ओवीत ‘वरिषले’ ऐवजी ‘वर्षले’, अग्निभाजी ऐवजी आगीमाजी, कर्मभानी ऐवजी ‘कर्म मानी’, आगा ऐवजी ‘अगा’, विशिं ऐवजी ‘विखिं’ किंवा ‘विषी’, निष्काम ऐवजी ‘निष्कामु’ असे मूळ ओवीतील अचूक शब्द असायला हवे होते. प्रश्नपत्रिकेतील पाचव्या प्रश्नातील पाचव्या उपप्रश्नाने तर चुकांचा उच्चांक गाठला आहे. मूळ रसविघ्न ‘स्वपरगतदेशकालविशेषावेश’ असे असताना मूळ ‘स्वपरगतदेशकाल विठोबा वेडा’ असा चुकीचा प्रश्न विचारला गेल्याने विद्यार्थ्यांना घाम फुटला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करणारे परीक्षकांचे पॅनेल, मुद्रितांची तपासणी, त्याची दुरुस्ती आणि छपाई या प्रक्रियेतील दोषींवर कारवाई करण्यासाठी विद्यापीठ कोणती पावले उचलणार याची प्रतीक्षा आहे. विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळ मर्जीतील प्राध्यापकांची परीक्षक पॅनेलवर वर्णी लावत असल्याने या चुका घडत असल्याचे मराठी विषयाच्या ज्येष्ठ प्राध्यापकांचे मत आहे. एकर जे प्राध्यापक मराठी शिकवतात पण, मराठी साहित्य शिकवत नाहीत, त्यांच्याकडून हा पेपर सेट करण्यात आल्याने चुकांची परिसीमा गाठली गेली, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ प्राध्यापकाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला दिली.
टंकलेखन करणारे मराठीचे तज्ज्ञ नसतात. परंतु, मुद्रिते तपासणाऱ्यांना या चुका लक्षात आल्या नाहीत का, असा सवाल आता उपस्थित झाला असून तज्ज्ञांच्या कुवतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या प्रश्नपत्रिकेतील चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे, याची दखल घेण्याची मागणी आता ऐरणीवर आली आहे.