मराठी भाषा धोरणावर राज्य सरकारने राज्यभरातून सूचना करण्याच्या राज्य सरकारच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला असून यासंदर्भात सूचनांचा पाऊस पडला आहे. कार्टून मालिकांमुळे दूरचित्रवाणीला चिकटलेली लहान मुले ही तमाम पालकांसाठी चिंतेचा विषय असली तरी त्यांच्या याच आकर्षणाचा फायदा मराठी भाषा नव्या पिढीत रुजविण्यासाठी करण्याची कल्पक सूचना पुढे आली आहे.
राज्य शासनाने मराठी भाषा धोरण जाहीर केल्यानंतर २५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातून सूचना व सुधारणा मागविल्या होत्या. विविध विद्यापीठांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन तज्ज्ञ, अभ्यासक व इतरांकडून यासंदर्भात मते घेण्याच्या सूचनाही राज्स सरकारने केल्या होत्या. त्यानुसार, मराठी भाषा धोरणावर झालेल्या चर्चामधून सूचनांचा पाऊस पडला आहे. छोटा भीम, शिन चान, माईटी राजू यासारख्या अनेक लोकप्रिय कार्टून्समुळे लहान मुले तासन्तास टीव्हीला चिकटून बसलेली असतात. मात्र, यापैकी एकही लोकप्रिय कार्टून मराठीत उपलब्ध नाही. मराठी भाषा नव्या पिढीत रुजविण्यासाठी कार्टून्सचा वापर करून घेण्यात यावा, असा विचार या चर्चांमधून समोर आला आहे. मराठी पात्रांवर आधारित मराठी भाषेतील अ‍ॅनिमेशन मालिका वा चित्रपट बालकांपर्यंत पोहोचल्यास मराठी भाषा सहजगत्या आत्मसात करण्याचा विचार मांडण्यात आला आहे.
याशिवाय, अनेक सूचना अभ्यासकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांमध्ये झालेल्या चर्चामधून मांडण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त वैज्ञानिक परिभाषा सोप्या मराठीत तयार करणे, ग्रामीण बोलीचे शब्द प्रमाण मराठीतून रुजविण्याकरिता जोरकस प्रयत्न करणे, मराठी वाहिन्यांवरून चुकीचे मराठी बोलले व लिहिले जाते, त्यावर नियंत्रण असावे, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण मराठीतून अनिवार्य करावे, प्रमाण मराठी ग्रामीण भागातील मुलांना समजणे व बोलणे सोयीचे व्हावे यासाठी विशेषज्ञ नेमून प्रशिक्षण द्यावे, यासारख्या अनेक सूचना अभ्यासकांनी केल्या आहेत. राज्य शासनाने २५ फेब्रुवारीपर्यंत या सूचना मागवल्या आहेत.
विविध माध्यमातून आलेल्या या सूचनांचे संकलन विद्यापीठांमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहे.