गरिबी म्हणजे काय रे भाऊ, असे विचारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रांनी गरिबांच्या मुलांच्या जीवनात नवे रंग भरण्याचा स्तुत्य उपक्रम जनमंच या स्वयंसेवी संस्थेने आरंभला आहे.  
शहरातील दोन शाळांतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या दोन हजार चित्रांमधून शुभेच्छापत्रे तयार करण्यात आली आहे. बजाजनगरातील विष्णुजी की रसोई येथे आयोजित कार्यक्रमात रेल्वे प्लॅटफार्म शाळेतील अल्लाउद्दीन या विद्यार्थ्यांच्या हस्ते या शुभेच्छापत्रांचा शुभारंभ झाला. सामाजिक संवेदना निर्माण करणे, सामाजिक बांधिलकीची जाणीव होणे आणि मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आदी बाबी जनमंचच्या या उपक्रमाने एकाच वेळी साध्य केल्या. शहरात राहणारा सुखवस्तू जीवन जगणारी व्यक्ती शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ग्रामीण भागातील शिक्षणाची दूरवस्थेबद्दल हळहळ व्यक्त करतो. यासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्याला वाटते, पण पाऊल टाकले जात नव्हते. त्यांना जनमंचने आत्महत्याग्रस्त कुटुंब, वंचित व गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. केवळ त्यांना जनमंच शुभेच्छापत्रे खरेदी करायची आहेत. प्रत्येक शुभेच्छापत्र बनवताना मूळ चित्राचा वापर करण्यात आला. दोन शाळांमधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या दोन हजार चित्रांची शुभेच्छापत्रे तयार करण्यात आली आहेत. शुभेच्छापत्रे प्रकाशनाला पत्रकार बाळ कुळकर्णी, शेफ विष्णु मनोहर, प्रा. शरद पाटील, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, सरचिटणीस राजीव जगताप, शुभेच्छापत्र उपक्रमाचे संयोजक आशुतोष दाभोळकर उपस्थित होते. या कार्यक्रमाआधी जनमंचच्या काही सदस्यांच्या आणि प्लॅटफार्म शाळेच्या मुलांनी चित्र रेखाटले.