वर्धा व इरई नदीसोबतच सिंचन प्रकल्पातून पाण्याचा उपसा करणाऱ्या ४ वीज केंद्र, ३ वेकोलि कोळसा खाण, २ मत्स्यबीज केंद्र, २ पाणी पुरवठा योजना आणि चंद्रपूर महापालिका व वरोरा नगर पालिका, अशा १३ विविध संस्थांकडे तब्बल १ कोटी ९२ लाख २७ हजाराचा पाणीकर शिल्लक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राकडे ९०.९५, तर चंद्रपूर महापालिकेकडे ६०.४८ लाखाचा कर शिल्लक असून या सर्वाना चंद्रपूर पाटबंधारे विभागाने तात्काळ कर भरण्याची नोटीस बजावली आहे.
या जिल्हय़ातून वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, उमा, अंधारी व झरपट या प्रमुख नद्या वाहतात. यामधून विविध उद्योग पाणी घेतात. त्या मोबदल्यात चंद्रपूर पाटबंधारे विभागाकडे पाणीकर भरावा लागतो. या जिल्ह्यात सर्वाधिक उद्योग वर्धा या एकाच नदीवर उभारण्यात आलेले आहेत. पाटबंधारे विभागाला या नदीतून पाणी घेणाऱ्या उद्योगांकडून सर्वाधिक महसूल प्राप्त होतो. मात्र, तब्बल १३ विविध संस्थांनी वर्धा व इरई नदीसोबतच सिंचन प्रकल्पातून पाण्याची उचल केली आहे. मात्र, १ कोटी ९२ लाख २७ हजाराचा पाणीकर अजूनही भरलेला नाही.
आज तो न भरणाऱ्या संस्थांमध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आघाडीवर असून तब्बल ९० लाख १५ हजाराची थकबाकी आहे. महाऔष्णिक वीज केंद्र इरई नदीतून नियमित पाण्याची उचल करते. यावर बांधण्यात आलेले धरण वीज केंद्राच्या मालकीचे असले तरी नदीच्या पात्रातून केलेल्या पाण्याचा उपसाकर पाटबंधारे विभागाकडे जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, वीज मंडळाने गेल्या कित्येक वर्षांपासून हा पाणी कर भरलाच नसल्याचे उघडकीस आले आहे.
चंद्रपूर मनपाकडे ६० लाख ४८ हजाराचा पाणीकर शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाने मनपाला यासंदर्भात वारंवार नोटीस बजावली आहे. मात्र, मनपाचे अधिकारी कर भरायला तयार नाहीत. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहराला इरई धरणातून मिळणारे पाणी केवळ वीज केंद्राच्या उपकारामुळे मिळत आहे. वीज केंद्राने पाणी देणे बंद केले तर शहराला पाणी पुरवठा करणारी दुसरी यंत्रणा मनपाकडे नाही. अशाही स्थितीत अधिकारी व पदाधिकारी दुसरी यंत्रणा उभारण्याच्या मन:स्थितीत नाहीत. या दोन प्रमुख संस्थांसोबतच वरोरा नगरपालिकेकडे १ लाख ६७ हजाराचा कर शिल्लक आहे. चार वीज केंद्रांकडे कर शिल्लक असून यामध्ये ताडाळी औद्योगिक वसाहतीतील मे. धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडे ९ लाख ७१ हजार, मे.गुप्ता एनर्जी प्रा. लिमिटेडकडे १९ लाख, चिमूर येथील शारदा अंबिका पावर स्टे. कंपनीकडे ४ लाख ६३ हजाराची शिल्लक आहे.
वेकोलिच्या ताडाळी कार्यालयाकडे १५ हजार, वेकोलि माजरी एरियाकडे २ हजार व वेकोलि तेलवासा खाणीकडे सहा हजाराची शिल्लक, तर चारगाव मत्स्यबीज केंद्राकडे १ लाख ६७ हजार व गडचांदूर मत्स्यबीज केंद्राकडे १ लाख ८१ हजाराची थकित आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही मत्स्यबीजकेंद्र अंमलनाला व चारगाव या दोन सिंचन प्रकल्पातून पाणी घेत आहेत. साखरवाही पाणी पुरवठा योजनेकडे २ लाख ४९ हजार, तर बोरगाव शिवणफळ पाणी पुरवठा योजनेकडे ४३ हजाराची थकबाकी आहे. या १३ विविध संस्थांकडील पाणीकराची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी चंद्रपूर पाटबंधारे विभागाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या १३ संस्थांना नोटीस बजावण्यात आलेली आहे, अशी माहिती चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.सोनवने यांनी लोकसत्ताला दिली. ही थकबाकी भरली नाही तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.