एका अल्पवयीन मुलाचे चारचाकी वाहनातून आलेल्यांनी अपहरण केले. मात्र, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तो मुलगा धाडसाने निसटला. अपहरणकर्त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
समीरखान इसूबखान (रा. पेंशननगर) हे त्या चौदा वर्षांच्या मुलाचे नाव आहे. तो काल दुपारी त्याच्या मित्राला भेटण्यासाठी सायकलने जात होता. जाफरनगरातून जात असताना मागून एक पांढऱ्या रंगाची टाटा मॅजिक जीप आली नि आडवी उभी झाली. त्यातून उतरलेल्या तिघांपैकी एकाने समीरच्या चेहऱ्यावर कापड टाकून तोंडालाही बांधले. जबरदस्तीने गाडीत टाकले. काही अंतरावर गेल्यानंतर गाडी थांबली. त्यातून उतरवले. चेहऱ्यावरून कापड काढल्यानंतर ते एक शेत असल्याचे त्याला दिसले. काहीवेळानंतर तो तेथून निसटला. धावत रस्त्यावर गेला. तेथून जात असलेल्या एका मोटारसायकलवाल्याला थांबवले. त्याला पोलीस ठाण्यात नेण्याची विनंती केली असता त्याने त्या मुलाला कळमेश्वर पोलीस ठाण्यात सोडले.
कळमेश्वर पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथील पोलिसांनी मुलाच्या कुटुंबीयांना तसेच गिट्टीखदान पोलिसांना कळविले. मुलाच्या नातेवाईकांनी कळमेश्वरला जाऊन मुलाला ताब्यात घेतले. मुलाला घेऊन ते गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी अनोळखी अपहरणकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दरम्यान, शासकीय बालगृहातील तीन मुले बेपत्ता झाल्याचे उघड झाले आहे. कार्तिक देवा भोसले (नायर), संदीप मोतीराम धुर्वे व मोहम्मद रजी अब्दुल अजीम हे अनुक्रमे १३, ११ व १० वर्षांची मुले शासकीय बालगृहात रहातात.
 शनिवारी नेहमीप्रमाणे त्यांना नागसेननगरातील वैशाली उच्च प्राथमिक शाळेत ऑटो रिक्षाने सोडण्यात आले होते. शाळा सुटल्यावर त्यांना घेण्यासाठी गेले असता ही मुले शाळेतून शिक्षकांची नजर चुकवून निघून गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.