गांधीविचाराकडे केवळ आदर्शवाद म्हणून पाहू नये. उलट, विद्यमान आधुनिकीकरणाच्या वाटचालीत मानवी मूल्ये उच्चतम मानणाऱ्या या विचारांचे संगोपन अपरिहार्य झाले आहे, असे विचार पश्चिम बंगालचे उच्चशिक्षण संचालक डॉ.पी.के.चॅटर्जी यांनी व्यक्त केले.
येथील न्यू आर्टस कॉलेजच्या गांधी अध्ययन केंद्रातर्फे  दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम सत्रात, २१ व्या शतकातील गांधी तत्वज्ञानाची उपयोगिता, या विषयावर बोलतांना डॉ.चॅटर्जी यांनी हे विचार व्यक्त केले. दुबई येथील विचारवंत प्रा.सज्जाद अली सैफी यांनी ग्रामीण समाजातील मूलतत्वे व विकासाची प्रक्रिया जतन करण्याचे कार्य गांधी विचारांनीच होऊ शकत असल्याचा विचार मांडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे म्हणाले की, शिक्षण व आरोग्याच्या नव्या संधी नाकारण्यात ग्रामीण परिसर आघाडीवर असतो. ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. ग्रामोद्योगातून खेडी स्वयंपूर्ण करण्याची गांधीजींची संकल्पना आज अधिक प्रासंगिक ठरते. काम नाकारणारे व काम करणारे, यातील सीमारेषा स्पष्ट व्हावी. खेडय़ांच्या स्वावलंबनाने अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडेल. गांधी विचार मानवी संवेदनांना सर्वोच्च प्राधान्य देतो. कारण, अशी संवेदनाच सृजनशील असते.
पंजाब विद्यापीठाचे डॉ.एस.डी.गगराणी (पटियाला) यांनी आधुनिक भारतातील जडणघडणीत गांधीविचाराचे योगदान नमूद केले. येणारा काळ हा अति-आधुनिकीकरणाचा आहे. तंत्रमूल्ये आक्रमक झाली असून मानवी मूल्ये आक्रसत आहेत. केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण विश्वाला आज गांधीविचारच तारू शकतो. डॉ.बलबिर सिंग म्हणाले की, विद्यार्थी नव्हे बाल अवस्थेपासूनच गांधीविचारांचे बाळकडू पाजणे आवश्यक मानावे. संगणकाच्या कौशल्याएवढेच स्वच्छतेचा झाडू मारण्याचाही विचार महत्वाचा मानावा. अशा मानसिकतेनेच इतरांपेक्षा भारतीय नागरिक वेगळा ठरतो.
विद्यापीठ अनुदानाने पुरस्कृत केलेल्या या चर्चासत्रात देशभरातून पाचशेवर लघुनिबंध सादर करण्यात आले. संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.जी.भोयर यांनी ही बाब आवर्जून नमूद करीत परिषदेची फ लश्रुती स्पष्ट केली. गांधी अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.प्रशांत कडवे यांनी विविध वक्त्यांच्या भूमिकेचा आढावा मांडला.