News Flash

मतदानाची सुटी घरीच ‘एन्जॉय’

साधारणपणे मतदानाकरिता सुटी मिळाली की पहिल्या प्रहरात मतदान करून पर्यटनासाठी जाण्याचा प्रघात आजवर बघायला मिळत होता.

| October 16, 2014 01:39 am

साधारणपणे मतदानाकरिता सुटी मिळाली की पहिल्या प्रहरात मतदान करून पर्यटनासाठी जाण्याचा प्रघात आजवर बघायला मिळत होता. यावेळी मात्र, परिस्थिती उलट झाल्याचे दिसून आले. मतदानाकरिता सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना सुटी असली तरीही खासगी कार्यालयांना मतदानाकरिता फक्त शिथिलता देण्यात आली होती. सुटी मात्र नव्हती. त्यामुळे मतदानाच्या दिवशी पर्यटकांनी गजबजणारी नागपूरच्या आसपासची पर्यटनस्थळे आज ओस पडलेली दिसून आली. नागपूरपासून अवघ्या एक-दीड तासाच्या अंतरावरील रामटेक, अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज, मनसर, खिंडसी, मैत्रबन, वाकी यासारखी अनेक पर्यटनस्थळे आहेत. एक दिवसाची सुटी आली रे आली की नागपूरकरांची धाव या पर्यटनस्थळांवर असते. रामटेक आणि मनसरचे धार्मिक पर्यटन, खिंडसीसारखा सुंदर बोटींगचा पर्याय असलेले पर्यटनस्थळ आणि अलीकडे नागपूरकरांच्या पसंतीत साहसी पर्यटनात अग्रक्रमावर असलेले अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज, आज मात्र पर्यटकांविना सुनेसुने होते. अतिशय तुरळक असा पर्यटकांचा प्रतिसाद होता. सुटीचा सुकाळ आणि वरुणराजाची कृपा यामुळे मतदारांपैकी ज्येष्ठांनी घरीच राहणे पसंत केले तर पहिल्यांदाच किंवा नुकतेच मतदानाला पात्र ठरलेली तरुणाई फुटाळयावर ‘एन्जॉय’ करताना दिसून आली. याविषयी सीएसी ऑलराउंडरचे संचालक अमोल खंते यांना विचारले असता लोकांनी मतदानाला अग्रक्रम द्यावा म्हणून आज अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज पर्यटकांसाठी बंद ठेवल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांच्या सहकाऱ्यांनादेखील त्यांनी आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी दिल्याचे सांगितले. एक दिवसाच्या सुटी पर्यटनात घालवणारा मतदार हा प्रामुख्याने खासगी क्षेत्रात काम करणारा आहे. मात्र, यावेळी खासगी कार्यालयांना सुटीच देण्यात आली नाही. मतदानासाठी एक-दोन तासांकरिता शिथिलता देण्यात आली. त्याचा परिणाम आज एक-दोन तासाच्या अंतरावरील पर्यटनस्थळांवर दिसून आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 1:39 am

Web Title: nagpur voters prefer to spend voting holidays at home
Next Stories
1 बूथवरील कार्यकर्त्यांची ‘सोय’
2 सेल्फी अन् मतदानाचा हक्क
3 अनधिकृत होर्डिग्ज, बॅनर्स, पोस्टर्स लावणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होणार