ही गोष्ट फार जुनी नाही. साधारणत: वर्षांपूर्वीची. नाशिक र्मचट्स सहकारी बँकेचे अध्यक्ष हुकूमचंद बागमार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याची. या कार्यक्रमास वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही बागमार यांच्या ‘शिस्तप्रिय’ कार्याची भुरळ पडलेली. त्यामुळे त्यांनी ‘नामको’ बँक जर विनंतीचंद, अजितचंद वा छगनचंद अशा कोणाच्या हाती असती तर नक्कीच बुडाली असती अशी टोलेबाजी करत बँकेला प्रगतीपथावर नेण्यास हुकुमचंद यांच्या शिस्तप्रिय कार्याचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले होते. बागमार यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ बरखास्त करुन रिझव्र्ह बँकेने प्रशस्तीपत्रकच नव्हे तर, ‘हुकुमचंद’ यांच्या अनभिषिक्त साम्राज्याला एकप्रकारे चाप लावला आहे. गैरव्यवहारांमुळे नव्हे तर, कामकाजातील प्रशासकीय त्रुटींवरून ही कारवाई झाल्याचे बँकेकडून सांगितले जात आहे.
नाशिक र्मचट्स सहकारी बँकेच्या मुख्यालयातील सभागृहात गेल्या वर्षी बागमार यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला होता. त्या निमित्ताने नाशिकमध्ये प्रथमच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. राज यांनी सहकार क्षेत्राची स्थिती बिकट असताना र्मचट्स बँकेने साधलेली प्रगती उल्लेखनीय असल्याचे म्हटले होते. बँकेच्या संचालक मंडळात सर्वपक्षीय नेते असूनही बागमार यांच्यामुळे ती प्रगतीपथावर राहिल्याचे त्यांनी सांगितले. बागमार यांच्या एकूणच कार्याचा झालेला गौरव पाहून त्यांच्या कार्यशैलीवर वारंवार आक्षेप नोंदविणारे सभासद अवाक्  झाले होते. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होण्यामागे बागमार यांची कार्यपध्दती कारणीभूत ठरल्याचे बँक कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.
सुमारे साडे तीन दशकांपासून हुकुमचंद बागमार यांची नामकोवर एकहाती पकड आहे. ‘मामा’ या नावाने ते ओळखले जातात. अध्यक्ष असो वा नसो मामाच बँकेचा सर्व गाडा चालवित असल्याचे बहुतेकांचे म्हणणे. म्हणजे संचालक मंडळ केवळ नावालाच. ‘मामा बोले आणि नामको चाले’ अशी एकूण स्थिती. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही सभासदांनी मामांच्या एककल्ली कारभारावर टीकास्त्र सोडून ते हुकुमशाही पध्दतीने कामकाज करत असल्याचे आक्षेप नोंदविले होते. परंतु, मामा नेहमीच सर्वाना पुरून उरले.
साखर घोटाळ्यात त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यानंतर ‘नामको’तून ते हद्दपार होतील, अशी काहींनी बांधलेली अटकळ फोल ठरली आणि सर्व सूत्रे पुन्हा त्याच्या हाती एकवटली. मामांच्या कार्यशैलीमुळे त्रस्त झालेल्या कर्मचारी संघटनेने सहकार विभाग आणि रिझव्र्ह बँकेकडे वारंवार गाऱ्हाणे मांडले. अभिष्टचिंतन सोहळ्यात मामांवर उधळली गेलेली स्तुतीसुमने आणि सध्याची कारवाई यातील फरक याची कारणमीमांसा काही सभासद करत आहेत.