उपेक्षितांच्या जाणिवा, अन्यायाविरुद्ध तीव्र संताप व बेधडक असे जालीम दर्शन नामदेव ढसाळ यांच्या साहित्यातून दिसते. त्यांच्या साहित्यातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा उपेक्षितांना मिळत राहील, असा सूर नाशिक व धुळे येथे विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभांमधून दिसून आला.
नाशिक येथील हुतात्मा स्मारकात विविध पुरोगामी, परिवर्तनवादी तसेच आंबेडकरप्रेमी संघटना व पक्षांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अत्याचारविरोधी कृती समितीचे निमंत्रक राहुल तुपलोंढे, भारिप बहुजन महासंघाचे नितीन भुजबळ, माकपचे प्रा. व्यंकट कांबळे, सिटूचे रवींद्र मोकाशी, ब्ल्यू वॉरिअर्सचे संतोष कटारे, अंनिसचे महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे मराठा सेवा संघाचे हंसराज वडघुले आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्क्‍सवादी नेत्या नगरसेविका अ‍ॅड. वसुधा कराड होत्या. ढसाळ यांनी शोषितांच्या दु:खाला वाचा फोडत मराठी साहित्याचा प्रांत समृद्ध केला. एकाच वेळी साहित्य, संघर्ष आणि अन्यायाच्या विरोधात रस्त्यावरचा संघर्ष करणाऱ्या महाकवीच्या अकाली निधनाने पुरोगामी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना सर्वानी व्यक्त केली.
ढसाळांनी जर आपली साहित्य निर्मिती इंग्रजीतून केली असती तर त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार निश्चित मिळाला असता. शोषितांची कविता खरोखर मुकी झाली. वंचितांच्या वेदना आता साहित्यकृती म्हणून जगाच्या वेशीवर कोण नेणार, असा सवाल करून जगाच्या दिशेने झेप घेणारा असा पँथर आता होणे नाही, असेही वक्त्यांनी सांगितले. लवकरच शहरात सर्वपक्षीय अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती अत्याचार विरोधी कृती समितीचे निमंत्रक तुपलोंढे यांनी दिली.
धुळे येथे संकल्प सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित श्रद्धांजली सभेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर, जैन पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र वाणी, डॉ. हाजी अलीयोद्दीन शेख, भाजपचे सरचिटणीस रामकृष्ण खलाणे आदी उपस्थित होते. खलाणे यांनी ढसाळ यांच्याविषयी माहिती दिली. डॉ. आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले ढसाळ ऐन तारुण्यात दलित चळवळींकडे आकर्षित झाले. लेखणीतून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडण्याचे काम ढसाळ यांनी प्रखरपणे केल्याचे त्यांनी नमूद केले. हिलाल माळी यांनी ढसाळ हे निव्वळ साहित्य किंवा साहित्यिकांपुरते मर्यादित नव्हते. दलित पँथरचे ते लढवय्ये नेते होते. उपेक्षितांच्या जाणिवा, अन्यायाविरुद्ध लढा त्यांनी दिल्याचे सांगितले.