हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मराठवाडा कृषी विद्यापीठाचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात येत असल्याचा अध्यादेश राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या सहीने सोमवारी काढण्यात आला.
मराठवाडा कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईकांचे नाव देण्याचा निर्णय गेल्या १९ जूनला राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांत त्यांनी राज्यात केलेल्या कृषी क्षेत्रातील बहुमोल योगदानाच्या सन्मानार्थ त्यांचे नाव विद्यापीठाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मराठवाडा कृषी विद्यापीठाचा नामविस्तार केल्याबद्दल कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले. मराठवाडा कृषी विद्यापीठाची या हरितक्रांतीच्या प्रणेत्याने राज्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या दिशेप्रमाणे वाटचाल सुरू आहे. त्यात कृषी विद्यापीठाचा मोठा वाटा असून, यापुढेही विद्यापीठ शेतकऱ्यांच्या सेवेत अशाच प्रकारे गतिमानपणे कार्यरत राहील, असा मानस डॉ. गोरे यांनी व्यक्त केला.
वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
वसंतराव नाईक यांच्या १००व्या जयंतीनिमित्त मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषिदिन साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांच्या हस्ते नाईक यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वास िशदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, कुलसचिव का. वि. पागिरे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. ना. ध. पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा. विशाला पटनम, उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य प्रा. डॉ. गि. मा. वाघमारे, विभागप्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. विलास पाटील, डॉ. यू. एम. वाघमारे, डॉ. भ. वि. आसेवार, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापकवृंद व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.