देशभरातील भाविकांचा राबता असणाऱ्या येथील काळाराम मंदिरातील एक पुजारी व व्यवस्थापकाच्या संगनमताने भाविकांची लुबाडणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मंदिरात भ्रमणध्वनी, कॅमेरा नेण्यास मज्जाव करत हे साहित्य बाहेर ठेवण्यासाठी बनावट पावती पुस्तकांद्वारे शुल्काची आकारणी करून भाविक आणि काळाराम मंदिर संस्थांनची फसवणूक केल्या प्रकरणी तीन जणांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.
मंदिराचे पुजारी उमेश पुजारी, व्यवस्थापक सुरेश जाधव आणि मनोज भावसार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळाराम मंदिरात दर्शनासाठी दररोज साधारणत १० ते १५ हजार भाविक येत असतात. शनिवार व रविवारी ही संख्या २० ते २५ हजारच्या घरात जाते. ही बाब लक्षात घेऊन पुजारी उमेश पुजारी व व्यवस्थापक सुरेश यांनी भाविकांकडून पैसे उकळण्यासाठी अनोखी शक्कल लढविली. मंदिरात दर्शनासाठी जाताना भ्रमणध्वनी, कॅमेरा व इतर साहित्य नेण्यास मज्जाव करत संबंधितांनी ते पूर्व दरवाजाजवळील भिंतीलगतच्या टपरीत ठेवण्याची सशुल्क व्यवस्था निर्माण केली. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याचे नामकरण ‘काळाराम मोबाईल सेवा’ असे केले. भ्रमणध्वनी ठेवण्यासाठी पाच रूपये, कॅमेरा व पिशवी ठेवण्यासाठी प्रत्येकी १० रूपये अशा स्वरूपात अनधिकृतपणे पैसे गोळा केले जात होते, अशी माहिती अन्य एका विश्वस्ताने दिली. हे पैसे गोळा करताना काळाराम मंदिर संस्थानच्या नावाचा वापर केला गेला. संस्थानच्या नांवाने बनावट पावती पुस्तकाची छपाई करण्यात आली. या व्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्यासाठी उमेश पुजारी व जाधव यांनी मनोज भावसार याची नेमणूक केली. त्यांच्यामार्फत दररोज या पद्धतीने पैसे गोळा केले जात होते. या संदर्भात अन्य विश्वस्तांनी तक्रार केली होती. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून या पद्धतीने पैसे गोळा करण्यास अन्य विश्वस्तांनी आक्षेप नोंदविला. हा प्रकार थांबविण्यासाठी भाविकांना या सर्व सेवा मोफत स्वरूपात संस्थानने पुरविण्याच्या मुद्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती संबंधित विश्वस्तांकडून देण्यात आली. अन्य विश्वस्तांनी अध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीवरून पांडुरंग बोडके यांनी उपरोक्त तीन संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संस्थानची कोणतीही परवानगी न घेता संशयितांनी मंदिराचे सेवा बनावट पावती पुस्तक छापून त्याचा वापर केला. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बनावट पावत्या देऊन ३३३५ रूपयांची फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी व्यवस्थापक जाधव व कर्मचारी भावसार यांना अटक केली असून उमेश पुजारी फरार झाला आहे.
पार्किंग सेवेचे काय ?
काळाराम मंदिरात दर्शनासाठी वाहने घेऊन येणाऱ्या भाविकांना वाहनतळावरही पैसे मोजावे लागतात. ही व्यवस्था अधिकृत आहे की अनधिकृत याची स्पष्टता होणे गरजेचे असल्याची भाविकांची भावना आहे. भ्रमणध्वनी व तत्सम साहित्य बाहेर ठेवण्यासाठी ज्या रितीने अनधिकृतपणे पैसे उकळले जात होते, तसा प्रकार वाहनतळावर सुरू आहे की काय, अशी साशंकता भाविकांनी व्यक्त केली आहे.