शाळा सुरू व्हायला अजून दोन आठवडे बाकी असले तरी पेन, पेन्सिली, व’ाा, पुस्तके इत्यादी शालोपयोगी साहित्य बाजारात दाखल होऊ लागले आहे. साधारणत स्पायडरमॅन, डोरेमॉन, छोटा भीम, बेनटेन या कार्टून व्यक्तिरेखांपासून ते शाहरूख, सलमान, आमिर ही खानत्रयीपर्यंत बहुतेकांच्या छबी वह्य़ांच्या मुखपृष्ठावर झळकत असतात. यंदाचे वर्ष मात्र त्याला अपवाद ठरले आहे. निवडणुकांमध्ये आलेल्या मोदीलाटेचा प्रभाव शालोपयोगी साहित्यावरही दिसून येत असून पेन-पेन्सिलींवर भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी दिसून येत आहे. शिवाय त्याच्या जोडीला मोदींची लफ्फेदार स्वाक्षरीही आहे! क्रिकेटपटूंपासून ते अभिनेत्यांपर्यंत व्हाया कार्टून हे सर्व पेन-पेन्सिली, व’ाांवर पाहण्याची आपल्याला सवय असते. यंदा मात्र मोदीलाटेने त्यांच्यावरही मात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत आलेली ‘मोदी’ नावाची लाट इतकी जबरदस्त आहे की शैक्षणिक साहित्यावरही भारताच्या भावी पंतप्रधानांची छबी झळकू लागली आहे. यंदा मोदींची छबी असलेले साहित्यही बाजारात विक्रीला आले आहे. शाळा १६ जूनला सुरू होणार असल्याने शैक्षणिक साहित्याच्या खरेदीला तसा जोर आलेला नाही. त्यामुळे, मोदींची छबी असलेल्या या साहित्याला नेमका किती प्रतिसाद मिळतो, हे गुलदस्त्यातच आहे.

शैक्षणिक साहित्य महाग
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शैक्षणिक साहित्य खासकरून वह्य़ा महाग झाल्या आहेत. वेगवेगळ्या दर्जाच्या वह्य़ांची किंमत डझनामागे ६० ते २५० रुपयांच्या आसपास होती. या वर्षी ती ८५ ते ३०० रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. एका वहीचा विचार करता फूलस्केप आकाराची उत्तम प्रतीची २०० पानी वही गेल्या वर्षी ४५ रुपयांच्या आसपास होती. यंदा या वहीची किंमत ५५ रुपयांवर गेली आहे, असे बोरीवलीतील माया आर्ट गॅलरी या दुकानाचे दौलत चौधरी यांनी सांगितले. वह्य़ांच्या किंमती वाढल्याने यंदा पालकांच्या खिशाला चांगलाच चाट पटणार आहे.