मराठी रंगभूमीवर गेली पन्नास वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील ‘लखोबा लोखंडे’चे स्मरण करीत चाळिशी पार केलेल्या ‘घाशीराम’च्या ‘नाना’ने शुक्रवारी मानाचा मुजरा केला. तर, प्रभाकरपंत पणशीकर यांच्या यशामध्ये पडद्यामागच्या कलाकाराची भूमिका बजावता आली याचा अभिमान वाटतो, अशी भावना विजया पणशीकर यांनी व्यक्त केली.
आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘तो मी नव्हेच’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते विजया पणशीकर, अभिनेत्री शमा वैद्य, पणशीकर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर, अभिनेते यशवंत दत्त यांच्या पत्नी वैजयंती दत्त यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नाटककार आणि सध्या रंगभूमीवर सादर होत
असलेल्या ‘तो मी नव्हेच’ नाटकाचे दिग्दर्शक श्रीनिवास भणगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
शिक्षणासाठी मुंबईला आलेली जयसिंगपूरची मुलगी वेदशास्त्रसंपन्न पणशीकर घराण्यातील प्रभाकर यांच्या प्रेमात पडून झालेला विवाह या स्मृतींना उजाळा देत विजया पणशीकर म्हणाल्या, पणशीकरांच्या दौऱ्यांमुळे संसारिक जीवनाचा आनंद मिळाला नाही, पण ‘नाटय़संपदा’ची जबाबदारी स्वीकारून सर्वाची वहिनी होण्याचे भाग्य मला लाभले. कोल्हापूरला परीक्षा देण्यासाठी गेल्यामुळे या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला मी जाऊ शकले नाही. मात्र, महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊन या नाटकाला यश मिळावे अशी प्रार्थना केली. देवीने माझी प्रार्थना ऐकली आणि पणशीकरांना उदंड यश मिळाले. त्यांच्या यशमध्ये माझाही खारीचा वाटा आहे याचा आनंद होतो.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक हे भटजीच्या भूमिकेतून लग्न लावतात. पुढे संसार मात्र नटांनाच करावा लागतो. ‘घाशीराम’चे यश कुणाचे! जब्बार पटेलांचे, भास्कर चंदावरकरांचे की कृष्णदेव मुळगुंद यांचे असा वाद रंगला होता.
अशा वादामुळे नाटय़व्यवसायाचे नुकसान होते. चांगले नाटक हे पदार्थासारखे असते. योग्य घटक योग्य प्रमाणात पडले की पदार्थ रुचकर होतो. गेली ५० वर्षे तीच चव ठेवण्याचे काम ‘तो मी नव्हेच’ नाटकाने केले आहे.