लोकशाहीत निवडून आल्यानंतर नेत्यांची संपत्ती चौपट होते. यामागे भ्रष्टाचारी प्रवृत्तीच कारणीभूत असून अशा नेत्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.  
श्री. पाटेकर यांच्या हस्ते शनिवारी कवठेमहांकाळ येथे नानासाहेब सगरे दूध उत्पादक संघाच्या दुग्ध प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन झाले  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील हेही उपस्थित होते.  प्रारंभी दूध संघाचे अध्यक्ष गणपती सगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आपल्या प्रमुख भाषणात श्री. पाटेकर म्हणाले की, गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्रातून पंतप्रधानपदाचा माणूस तयार होऊ शकला नाही हे पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या राज्याच्या दृष्टीने खेदजनक म्हणावे लागेल. राज्याच्या गृहखात्याकडे असणारा पोलीस जनतेच्या संरक्षणाचे व संपत्तीच्या सुरक्षेचे काम चोखपणे बजावत असतो. हे अत्यंत मोलाचे काम असले तरी आपण कृतज्ञता व्यक्त करण्यात मागे राहतो असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या राजकीय स्थितीबाबत ते म्हणाले की, राजकारण हा व्यवसाय झाल्याने त्यागीवृत्ती अभावानेच आढळते. हे प्रगल्भ लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. व्यवसाय म्हणून याकडे लोक येत असल्याने निवडणुकीत निरपेक्ष वृत्तीच्या लोकांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत नाही असेही त्यांनी सांगितले.