नंदुरबार जिल्ह्यावरील वर्चस्वासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या झुंजीचे प्रतिबिंब जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिसून येत असून दोन्ही पक्षांच्या प्रसिध्द राजकीय कुटूंबांची प्रतिष्ठा या निवडणुकांमुळे पणास लागली आहे. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार असल्याने यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. आक्रस्ताळी प्रचारामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांची झोप उडाली आहे. आदिवासी तसेच अहिराणी भाषेत प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या विविध स्वरुपाच्या गीतांमुळे मतदारांचे मनोरंजन होत आहे.
या निवडणुकीत प्रमुख नेत्यांच्या घरातील मंडळी उमेदवारी करीत असल्याने संपूर्ण कुटुंबच राजकीय रंगात रंगून गेल्याचे प्रत्ययास येत आहे. राष्ट्रवादीचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या पत्नी कुमुदिनी गावित स्वत: जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात आहेत. शिवाय डॉ. गावित यांचे लहान बंधू प्रकाश गावितही रिंगणात आहेत. एवढेच नव्हे तर, डॉ. गावितांचे बंधू आमदार शरद गावित यांची कन्या अर्चना गावित यादेखील प्रथमच राजकीय पटलावर पदार्पण करीत आहेत. एकाच कुटूंबातील ही संख्या बघितल्यास इतर कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी कितीही प्रयत्न करून त्यांची कशी निराशा झाली असेल ते सहजपणे लक्षात येऊ शकेल. राष्ट्रवादीच्या गावित कुटूंबात अशी परिस्थिती असताना काँग्रेसचे पाठीराखे असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या कुटूंबातही बहुतांश प्रमाणात अशीत स्थिती आहे. त्यांचे पुत्र भरत गावित व स्नुषा संगिता गावित या दोघांनीही जिल्हा परिषद निवडणुकीत उडी घेतली आहे. या दोघांची उमेदवारी माणिकराव गावित यांच्या प्रतिष्ठेचा विषय झाल्याने सध्या हे कुटुंबही पूर्णपणे राजकारणाच्या रंगात रंगले आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयपालसिंग रावल व त्यांच्या पत्नी ऐश्वर्या रावल हे दाम्पत्यही वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटात आपले भाग्य पडताळून पाहात आहेत. नव्यानेच काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेस केलेले सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुकीस सामोऱ्या जात आहेत. माकपचे जयसिंग माळी व त्यांच्या पत्नी तापीबाई माळी तसेच मंगलसिंग चव्हाण व त्यांच्या पत्नी इंदिराबाई चव्हाण हेही निवडणुकीच्या मैदानात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि माकप या पक्षातील कुटुंब सध्या राजकारमात तल्लीन होऊन गेले आहे.