मेळाव्यात इच्छुकांची संख्या अधिक तर कार्यकर्त्यांची संख्या कमी.. गर्दी जमविण्यासाठी अखेपर्यंत चाललेला आटापिटा.. इच्छुकांनी स्पर्धकाविषयी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी.. या सर्व कोलाहलात ध्वनीक्षेपकाचा ताबा घेऊन विरोधकांवर तोफ डागत आणि स्वकीयांना कानपिचक्या देत प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी केलेले मार्गदर्शन.. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची उडविलेली खिल्ली.. उत्तर महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मंगळवारी आयोजित काँग्रेसच्या मेळाव्याची ही ठळक वैशिष्ठय़े ठरली.
आघाडी की स्वबळावर याचा तिढा सुटला नसताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराचा प्रारंभ या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आला. येथील तुपसाखरे लॉन्समध्ये झालेल्या मेळाव्यास इच्छुक अधिक तर कार्यकर्ते कमी अशी स्थिती होती. कार्यकर्ते जमत नसल्याने दोन तास विलंबाने मेळावा सुरू झाला. गर्दी जमविण्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांची दमछाक झाली. मेळावा प्रत्यक्ष सुरू झाल्यावर व्यासपीठावरील खुच्र्याची गर्दी वाढतच गेली. यावेळी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. मेळाव्याआधी पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर्गत मतभेद, गटबाजीचे राजकारण यावर बोट ठेवले.
बैठकीत कुरघोडीचे राजकारण लक्षात घेऊन राणे यांनी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. एकमेकांच्या विरोधात बोलण्याऐवजी विरोधकांबद्दल बोला असेही सुनावले. प्रचारात आपण सांगितलेल्या मुद्यांचा विचार करा, त्याचा प्रचार करा आणि ते आचरणात आणा असे आवाहन केले. आपणास डावलले गेले याची खंत बाळगण्याऐवजी पक्षहिताचा विचार करा असा सल्ला त्यांनी दिला. भाजपने जनतेची दिशाभूल केली. पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या भूमिकेत वेळोवेळी बदल झाल्याचा आरोपही राणे यांनी केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर टिकास्त्र सोडताना राणे यांनी त्यांची नक्कल केली. ठाकरे यांचा उल्लेख सध्या ‘भावी मुख्यमंत्री’ असा होत आहे. ते कायमस्वरूपी भावीच असावे अशी आपली अपेक्षा आहे. ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी आवश्यक क्षमता, गुण तसेच मनुष्यबळ नसल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपचे देवेंद्र फडणवीस नाकातल्या नाकात काय बोलतात ते समजत नाही. ठाकरेची तऱ्हा निराळी. भाजप आणि सेनेकडे मुख्यमंत्री पदासाठी एकही लायक नेता नाही हे राणे वारंवार सांगत होते.
थोरात यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जातांना कार्यकर्त्यांनी लोकसभेतील पराभव लक्षात ठेवायला हवा याची जाणीव करून दिली. कार्यकर्त्यांनी संघटीत होऊन लढल्यास विधानसभा निवडणूक काँग्रेसला अवघड नाही असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसवर माणिक कोकाटेंची आगपाखड
नाशिक जिल्हा छगन भुजबळ यांना आंदण दिला आहे काय, असा प्रश्न करून भुजबळांविरोधात लढण्यासाठी पक्ष ताकत देत नसल्याचे सांगत
आ. माणिक कोकाटे यांनी काँग्रेसवर टिकास्त्र सोडताना आपण सेना-भाजप युतीकडून अथवा अपक्ष म्हणूनही रिंगणात उतरु शकतो असे संकेत दिले. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी ते अल्पकाळ आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेससह भुजबळांवर
टिकास्त्र सोडले. पुढील दोन दिवसात आपण भूमिका जाहीर करू असेही कोकाटे यांनी सांगितले.

छायाचित्र काढण्यासाठी तरी निवडून द्या.
मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या गर्दीतून काही विषय चर्चेसाठी समोर येत असतांना नारायण राणे यांनी आता काही विषय नको, तुमच्या समस्या नेहमीच्या आहेत, त्यात नावीन्य काही नाही. मुख्यमंत्री पदाचे म्हणत असाल तर भाजप सेनेकडे लायक उमेदवार नाही. राज्यात काँग्रेसचे सरकार यावे, तुम्हाला राणेंसोबत छायाचित्र काढता यावे यासाठी आपणास निवडून द्या असे म्हणताच बाळासाहेब थोरात म्हणतील मला का नाही? तर तसे काही नाही असे सांगत राणे यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना शांत करत आपली अंतस्थ इच्छा अप्रत्यक्षपणे अधोरेखीत केली.