News Flash

यश दिल्लीत, तरतरी गल्लीत

दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाला अभूतपूर्व यश मिळाल्याने गल्लीतील शाखांमध्येही उत्साह संचारला आहे.

| February 14, 2015 01:43 am

दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाला अभूतपूर्व यश मिळाल्याने गल्लीतील शाखांमध्येही उत्साह संचारला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर गलीतगात्र झालेल्या ‘आप’च्या स्थानिक नेत्यांना दिल्लीतील विजयामुळे पुन्हा तरतरी आली असून निवेदनाव्दारे विविध समस्या मांडण्यास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरूवात केली आहे.
जिल्ह्य़ातील शालेय प्रवेश प्रक्रिया आणि ग्रामसभा याविषयी आपतर्फे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रत्येक शाळा व विद्यालय आपल्या सोयीनुसार प्रवेश प्रक्रिया राबवितात. तसेच संस्था मनमानी पद्धतीने मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीररित्या शुल्क आकारतात. प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही शिक्षण विभागाकडून होत नसल्याचा आरोप निवेदनातू करण्यात आला आहे. प्राथमिक व मध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ तयार करावे, कार्यालयात नागरिकांची सनद लावण्यात यावी, कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक योजनांची माहिती प्रत्येक खासगी व सरकारी अनुदानीत, विनाअनुदानीत शाळा व विद्यालयांमध्ये लावण्यात यावी, मुलींना १२ वी आणि मुलांना १० वीपर्यंत मोफत शिक्षण योजनेचा फलक शाळा व विद्यालयात लावावा, सर्व खासगी, सरकारी शाळा तसेच महाविद्यालयांच्या दर्शनी भागात शैक्षणिक शुल्काचे फलक लावावेत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण कार्यालयातून सर्व प्रकारच्या शाळांच्या प्रवेश प्रक्रियेच्या तारखा घोषित करण्यात याव्यात. तसेच त्या तारखा नोटीस फलकावरही लावाव्यात. सर्व शाळांची प्रवेश प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण कार्यालयामार्फत राबविण्यात यावी, कार्यालयामार्फत मंजूर करण्यात आलेल्या शुल्काची माहिती कार्यालयाच्या संकेत स्थळावर द्यावी, सर्व प्रकारचे शुल्क धनादेश स्वरूपात स्विकारण्याचे बंधनकारक करावे, प्रत्येक शाळा व विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातही सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय पक्षातर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ग्रामसभा व नागरिकांची सनद याविषयी नियमानुसार अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीत होणाऱ्या ग्रामसभा आणि पंचायत समितींच्या वतीने होणाऱ्या तालुका सभा याबाबत नागरिकांना माहिती दिली जात नाही. या सभा नियमानुसार होत नाही. कुठल्याही कार्यालयात नागरिकांची सनद लावली जात नाही. या कार्यालयामार्फत कोणत्या योजना राबविल्या जातात, याची माहिती कार्यालयाच्या आवारात लावली जात नाही. त्यामुळे नागरिकांचा सहभाग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाढत नसल्याची तक्रार आप पक्षाने केली आहे.निवेदनात आपच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ग्रामसभा नियमानुसार घ्याव्यात, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीत नागरिकांची सनद दर्शनी भागात लावावी, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत सुरू असलेल्या विकास कामांविषयी फलक लावण्यात यावा, ग्रामसभेत वार्षिक लेखा-जोखा मांडण्यात यावा, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये होणाऱ्या सभांची नोटीस ग्रामपंचायत फलकावर लावण्यात यावी, प्रत्येक ग्रामपंचायतीत नागरिकांच्या मोबाईल नंबरची माहिती ठेवण्यात यावी, नियमानुसार काम न करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही निवेदनांवर जिल्हा समन्वयक अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, सहसमन्वयक अल्ताफ शेख, जिल्हा सचिव मिलींद पगार, नकूल बोराडे आदींची स्वाक्षरी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 1:43 am

Web Title: nashik aap workers in enthusiasm after winning delhi poll
Next Stories
1 सीसी टीव्ही कॅमेऱ्याची नजर केवळ तात्पुरती
2 दूषित पाणीपुरवठय़ामुळे इगतपुरीकरांचे आंदोलन
3 नाशिकमध्ये सृजन बाल चित्रपट महोत्सव
Just Now!
X