सिंहस्थात शाही मिरवणुकीचा मार्ग नेमका कोणता, याविषयी अद्यापही सूचनांचा भडिमार सुरूच असून पारंपरिक जुना शाही मार्ग कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, अशी भूमिका घेत सिंहस्थ ग्राम उत्सव समितीने त्यात भर टाकली आहे. समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. समितीशी समन्वय राखण्यासाठी व समितीच्या बैठकांना शासनाचा प्रतिनिधी उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य करत जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांची यासाठी नियुक्ती करण्याचे ठरविले असल्याची माहितीही समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
समिती सदस्य व जिल्हाधिकारी यांच्या प्रदीर्घ झालेल्या चर्चेत शाही मार्गाचा मुद्दा अग्रस्थानी होता. पारंपरिक शाही मार्ग कोणाच्या राजकीय हट्टासाठी किंवा कुणा महंतांच्या सांगण्यावरून बदलू नये अशी भूमिका समिती सदस्यांनी मांडली. सर्व आखाडय़ांचे महंत आणि सुमारे ३०० खालसे यांच्या संपर्कात आपण असून त्यातील अनेक आखाडय़ांचे महंत व उपश्री महंत यांनी आमच्या शाही मार्गाच्या प्रस्तावाला समर्थन दिल्याचा दावाही समितीने या वेळी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे कुंभमेळा उच्चस्तरीय समिती व शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्याचे समितीने नमूद केले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात समितीने सुचविलेल्या स्वयंसेवकांना प्राधान्य देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करून समितीच्या स्वयंसेवकांनी मागील कुंभमेळ्यात उत्कृष्ट काम केल्याचे मागील कुंभमेळ्याच्या प्रशासकीय अहवालात असल्याचे नमूद केले. समितीला अन्न क्षेत्र, प्रथमोपचार केंद्रासाठी जागा देण्याबाबत पालिका आयुक्तांशी जिल्हाधिकारी चर्चा करणार आहेत.
समिती कुंभमेळ्यासाठी सुरू करत असलेल्या संकेतस्थळ आणि कॉल सेंटरसाठी शासनाच्या विविध स्तरांवरील माहितीची देवाणघेवाण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. शाही मार्गासंदर्भात प्रस्तावित व जुना शाही मार्ग असा वाद विकोपाला गेल्यास तिसरा पर्याय सुचविण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचे समितीने म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत समितीचे कार्यकारी अध्यक्ष भगवान भोग, उपाध्यक्ष रामभाऊ जानोरकर, पद्माकर पाटील, सरचिटणीस लक्ष्मण धोत्रे, चिटणीस हरिभाऊ लासुरे आदी सहभागी झाले होते.
सिंहस्थात येणाऱ्या साधू, महंत व भाविकांचे स्वागत करणे, शासन, प्रशासन व महापालिका यांच्याशी समन्वय ठेवून सेवाभावी वृत्तीने सिंहस्थात काम करण्यासाठी सिंहस्थ ग्राम उत्सव समितीची स्थापना मागील तीन कुंभमेळ्यांपूर्वी करण्यात आली आहे. समितीत सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्थांचे प्रमुख व अनुभवी पदाधिकारी व नागरिकांचा समावेश आहे. कुंभमेळा हा पंचवटीच्या केंद्रस्थानी होत असल्यामुळे या समितीत पंचवटीकरांचा अधिक समावेश आहे.