News Flash

निकालाने आघाडी भानावर, एकतेच्या तालावर

नाशिकच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणुनही मतपेटीतून बाहेर आलेल्या धक्कादायक निकालांनी धास्तावलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर

| May 22, 2014 12:28 pm

नाशिकच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणुनही मतपेटीतून बाहेर आलेल्या धक्कादायक निकालांनी धास्तावलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर परस्परांना जबाबदार न धरता प्रथमच परस्परांना मानसिक आधार देण्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तयारी सुरू केली आहे. लोकसभेच्या वेदनादायी निकालाच्या पराभवाच्या जबाबदारीचा विषय बाजुला ठेवून अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीने निकालांचे विश्लेषण करतानाच विधानसभेची तयारीही सुरू केली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस मुंबईत जिल्हावार प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावत पराभवाविषयी मंथन करणार आहे. राज्य पातळीवरील या बैठकीनंतर स्थानिक पातळीवर उभय पक्षांत बैठक होऊन पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे.
जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेस आघाडीला दारूण पराभव पत्करावा लागला. या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या कोटय़ातील होत्या. नाशिक मतदारसंघात महायुतीच्या हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना पावणे दोन लाखाहून अधिकच्या मताधिक्याने पराभूत केले. हा निकाल राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागणारा ठरला. जवळपास एक दशकभर पालकत्वाची मंत्री या नात्याने जबाबदारी सांभाळणाऱ्या भुजबळांनी संपूर्ण जिल्ह्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. गतवेळी नाशिक लोकसभेची जागा काबीज केल्यावर येवला, नांदगाव विधानसभा मतदारसंघाबरोबर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविला. लोकसभेच्या रिंगणात उतरण्याआधी तब्बल १२५० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आल्याचा दावा केला जातो. ‘प्रचंड’ विकास कामे करूनही भुजबळांना पराभवाचे धनी व्हावे लागल्याची सल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बोचत आहे.
राष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या मोदी यांच्या प्रचाराला ठोस उत्तर देण्यात आघाडी कमी पडली. सलग दहा वर्ष सत्तेवर असल्याने काँग्रेस आघाडीविषयी जनमानसात नकारात्मक भावना निर्माण झाली. नाशिक मतदारसंघात जातीयवादाला खतपाणी घालण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जितका नाशिकचा विकास झाला नाही, तितका विकास भुजबळ यांनी घडवून आणला. परंतु, खोटय़ा प्रचाराला मतदार भुलले आणि विकासाचा आघाडीचा मुद्दा फिका पडला, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी नमूद केले. निवडणुकीत सलग ५८ दिवस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे अथक मेहनत केली. त्यामुळे जिल्हा पातळीवर संघटनात्मक बदल करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीत नेमक्या कोणत्या उणिवा राहिल्या त्याचा स्थानिक पातळीवर अभ्यास केला जात असून लगोलग विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आल्याचे पवार यांनी नमूद केले. गतवेळी राष्ट्रवादीच्या ताब्यात आठ तर उर्वरित सात जागा काँग्रेसकडे होत्या. त्यातील केवळ दोन ते तीन विधानसभा मतदार संघांचा अपवाद वगळता सर्व ठिकाणी आघाडीची पिछेहाट झाली आहे. भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाचाही त्यात समावेश आहे. लोकसभेच्या निकालांविषयी खुद्द शरद पवार हे जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी २३ तारखेला मुंबईत राष्ट्रवादी भवनमध्ये चर्चा करणार आहेत. या निकालांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जबर धक्का बसला आहे. उपरोक्त बैठकीनंतर त्यांना मानसिक आधार देण्यासाठी स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत तसेच काँग्रेस समवेत बैठक बोलाविली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या सुरूवातीला काँग्रेसचे सिन्नरचे आ. माणिक कोकाटे आणि भुजबळ यांचे चांगलेच बिनसले होते. काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनी भुजबळांच्या कार्यशैलीविषयी पक्षाच्या नेत्यांसमोर नाराजी तीव्र शब्दात प्रगट केली होती. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या या घडामोडी असूनही राष्ट्रवादीने पराभवाचे खापर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर फोडण्याचे टाळले. राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी जिल्हावार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर उभय पक्षात स्थानिक पातळीवर सुसंवाद साधण्यावर भर दिला जाईल. काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निकालानंतर आपला भुजबळ विरोध म्यान केला आहे. उलट, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन दोन्ही पक्ष परस्परांना मानसिक धैर्य देण्याच्या तयारीला लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 12:28 pm

Web Title: nashik congress ncp united after defeat in lok sabha poll
टॅग : Congress,Ncp
Next Stories
1 आरोग्य व्यवस्थेच्या नियोजनात नदी आडवी
2 छगन भुजबळांसाठीची ‘आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा’ही निष्प्रभ
3 अमरीश पटेल यांना जनसंपर्क अभावाचा फटका
Just Now!
X