सिंहस्थाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ आता शासनाने नाशिकचे पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांची तडकाफडकी बदली केली आहे. सिंहस्थात सुरक्षिततेसाठी बसविण्यात येणाऱ्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या मुद्दय़ांसह ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेविषयी विधिमंडळात तक्रारी झाल्यानंतर राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याचे अधोरेखित होत आहे. सरंगल यांच्या जागी मानवाधिकार विभागाचे (मुंबई) महानिरीक्षक एस. जगन्नाथन यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन पोलीस आयुक्तांसमोर लाखो भाविकांचा सहभाग असणारा सिंहस्थ कुंभमेळा आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्याचे आव्हान आहे.
सिंहस्थाची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची ऐनवेळी बदली केली जाणार नसल्याचे शासनाने याआधी स्पष्ट केले होते. यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी बदलीची विनंती केल्यानंतर काही काळ त्याबाबत निर्णय घेतला गेला नाही. अखेर पाटील यांच्या बदलीचा अर्ज मान्य करण्यात आला. पोलीस आयुक्तांचे मात्र तसे नव्हते. उलट, सिंहस्थाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, शाही मिरवणुकीचा मार्ग, गर्दीच्या ठिकाणांचा अभ्यास, त्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा सर्व पातळीवर सक्षम राहावी यासाठी सरंगल यांचे नियोजन सुरू होते. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे अनेक टप्पेही त्यांनी पूर्ण करवून घेतले. सिंहस्थाच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे याच काळात शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये अचानक वाढ झाली. त्यातच, सिंहस्थाच्या निमित्ताने शहरात कायमस्वरूपी सीसी टीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आधी नियोजन होते. परंतु, कायमस्वरूपी व्यवस्थेतील अडचणी लक्षात घेऊन पुढे ही व्यवस्था भाडे तत्त्वावर करण्याचा निर्णय घेतला गेला. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापनाही करण्यात आली. तात्पुरत्या स्वरूपात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याच्या निविदेला पहिल्या प्रयत्नात प्रतिसाद लाभला नाही. पुन्हा फेरनिविदा प्रसिद्ध करावी लागली. या घडामोडी सुरू असताना विधिमंडळाच्या अधिवेशनात ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याची परिणती सरंगल यांच्या बदलीत झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
पोलीस आयुक्तपदावर जवळपास तीन वर्षे सरंगल हे कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी नाशिक हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात होते. काही राजकीय पक्षांनी गुन्हेगारीला खतपाणी घातल्यामुळे हाताबाहेर गेलेली स्थिती नियंत्रणात आणण्यात सरंगल यांनी धडाडीने काम केले. कोम्बिंग ऑपरेशन, वाहनांची तपासणी, संघटित टोळक्यांवर मोक्का आणि तडिपारीची कारवाई आदींच्या माध्यमातून गुन्हेगारी मोडून काढण्याचे प्रयत्न केले. त्यात काही अंशी यश मिळत असताना सिंहस्थाची तयारी सुरू झाली. सिंहस्थात जवळपास ८० लाख भाविक नाशिक शहरात दाखल होणार आहेत. त्या दृष्टीने अतिशय सूक्ष्म पातळीवर नियोजन केल्याचे दृष्टिपथास पडत होते. या अनुषंगाने तयारी सुरू असताना सरंगल यांची बदली करण्यात आली. मागील काही महिन्यांत बिघडलेली कायदा व सुव्यवस्था हेदेखील त्यामागील कारण असू शकते. महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. चोरटे पोलीस असल्याची बतावणी करून महिलांची लूटमार करत आहेत. अव्याहतपणे चाललेल्या घरफोडय़ा, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चोऱ्या, टोळक्याच्या मारहाणीत झालेला युवकाचा मृत्यू, टोळक्यांच्या अंतर्गत वादातून गोळीबार असे प्रकार घडत आहेत. याकडे विधिमंडळाच्या अधिवेशनात काही सदस्यांनी लक्ष वेधले. या पाश्र्वभूमीवर सरंगल यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. नाशिक पोलीस आयुक्तपदाची धुरा मुंबईच्या मानवाधिकार विभागाचे महानिरीक्षक एस जगन्नाथन यांच्यावर सोपविण्यात आली आहे.