दिंडोरी तालुक्यातील आंबेगण येथील आश्रमशाळेत पाचवीत शिकणाऱ्या रवींद्र राधड (१२) या विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्यानंतर संस्थेने या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्याध्यापकासह तिघांना निलंबित केले आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसमवेत बाहेर जातानाही प्रमुख जबाबदार व्यक्तींपैकी कोणीतरी असावे, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.
नाशिक-पेठ रस्त्यालगत आंबेगण येथे आदिवासी आश्रमशाळा असून पाचवीत शिकणारा रवींद्र राधड (रा. फोफळवाडे ता. दिंडोरी) हा विद्यार्थी शनिवारी दुपारपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह रविवारी दुपारी झार्ली बंधाऱ्यात आढळून आला. या शाळेतील विद्यार्थ्यांना दर शनिवारी अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी शाळेजवळील झार्ली वळण बंधाऱ्यात नेले जाते. या शनिवारीही सर्व विद्यार्थी तलावावर गेले. विद्यार्थ्यांसोबत फक्त पहारेकरी उमेश म्हसदे होते. अधीक्षक वगैरे कोणीही नव्हते. मुले अंघोळ करत व कपडे धूत असताना रवींद्र हा पाण्यात बुडाला. परंतु ते कोणाच्या लक्षातही आले नाही. मुले आश्रमशाळेत परतल्यावर रवींद्रची बहीण दिपाली हिने आपला भाऊ कुठे आहे, अशी विचारणा केल्यावर तो बेपत्ता असल्याचे सर्वाच्या लक्षात आले. त्यानंतर आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्याने रवींद्रच्या घरी फोफळवाडे येथे त्याच्या आई-वडिलांना रवींद्र बेपत्ता झाल्याची खबर दिली. त्यानंतर सायंकाळी पालकांनी आश्रमशाळेकडे धाव घेतली असता तेथे अधीक्षक, मुख्याध्यापक, पहारेकरी कोणीही उपस्थित नव्हते.
दिंडोरी पालीस ठाण्यात मुख्याध्यापक ए. के. सावंत यांनी रवींद्र बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शनिवारी रात्री घटनास्थळी शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. रविवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तलावात शोध घेण्यात आला. नाशिकहून अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन वाजता रवींद्रचा मृतदेह हाती लागला. र दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आल्यावर रात्री उशीरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, प्रारंभी नातेवाईक व ग्रामस्थांनी संस्थेच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेल्याबद्दल रोष व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मृताच्या पालकांना नोकरी देण्याचे संस्थेतर्फे कबूल करण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी संस्थेचे काही पदाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रकरणी  अधीक्षक एस. बी. रौंदळ, मुख्याध्यापक ए. के. सावंत, पहारेकरी उमेश म्हसदे यांना निलंबित केल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.