त्र्यंबक रस्त्यावरील शांतता क्षेत्रात अनधिकृतपणे उभारलेल्या गाळ्यांचे कवित्व अद्याप सुरू असून महापौरांच्या मध्यस्तीने या ठिकाणी गाळे उभारणीस हिरवा कंदील दाखविला गेल्यानंतर आता पालिकेने हे गाळे उभारणाऱ्या मंडप डेकोरेटरविरुध्द तक्रार दिली आहे. नाशिक पश्चिम विभागीय अधिकाऱ्यांच्या या तक्रारीवरून डिंगोरे मंडप डेकोरेटर्स व जोसारभाई डेकोरेटर्स यांच्याविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय व सभोवतालचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून जाहीर आहे. या परिसरात ध्वनी प्रदुषण होऊ नये म्हणून रुग्णालयालगत व समोर उभारल्या जाणाऱ्या गाळ्यांना पोलिसांनी आधीच आक्षेप घेतला होता. आर्थिक लाभासाठी गाळे उभारणीस परवानगी देऊ नये अशी सूचना त्यांनी केली.
या मुद्यावर महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांची भूमिका संशयास्पद राहिली. प्रारंभी गाळे उभारणीला हरकत घेणाऱ्या महापौरांनी नंतर शासकीय रुग्णालयाप्रमाणे पोलीस यंत्रणेने सहकार्य करावे, असे धोरण स्वीकारले. या घडामोडी सुरू असताना गाळे उभारणीचे काम पूर्णत्वास जाऊन विक्रेत्यांनी आपला व्यवसायही सुरू केला. साधारणत: दहा ते बारा दिवसांपासून चाललेल्या घोळात आता नवा अध्याय जोडला गेला आहे.
नाशिक पश्चिम विभागाच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांनी त्र्यंबक रस्त्यावर परवानगीविना उभारलेल्या गाळ्यांविरुध्द तक्रार दिली आहे. डिंगोरे मंडप डेकोरेटर्स व जोसारभाई डेकोरेटर्स यांनी पालिकेची लेखी अथवा तोंडी परवानगी न घेता रस्त्यावर अनधिकृतपणे गाळे लावून अडथळा निर्माण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या तक्रारीवरुन दोन्ही मंडप डेकोरेटर्सविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुख्यालयातून गाळ्यांसाठी ठिकाणे जाहीर झाली असल्याचे नमूद केले. मंडप उभारणाऱ्यावर कारवाई करणारी पालिका विक्रेत्यांवर कारवाई करणार काय, यावर त्यांनी मुख्यालयात संपर्क साधा असे सांगून बोलणे टाळले.
प्रत्येकाचा नामानिराळे राहण्याचा प्रयत्न
शांतता क्षेत्रात अनधिकृतपणे उभारल्या गेलेल्या गाळ्यांमुळे आपण अडचणीत सापडू नये असा पालिका व पोलीस यंत्रणेचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी प्रारंभी लेखी पत्र देऊन या गाळ्यांवर हरकत नोंदविली. पण, नंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीवर र्निबध टाकण्याचाही निर्णय घेतला. पालिकेने या गाळ्यांवर हरकत घेऊन नंतर इतर यंत्रणांना राजी करण्यासाठी धडपड केली. आता गाळे उभारणाऱ्याविरुध्द तक्रार दिली आहे. भविष्यात हा वादाचा मुद्दा ठरल्यास आपल्या परीने खबरदारी घेतलेली बरी, अशी दोन्ही विभागांची कार्यशैली आहे की काय, अशी साशंकता निर्माण झाली आहे.