तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागातील २२५ प्राथमिक व माध्यमिक शाळांनी येथील सीडीओ मेरी शाळेत पंचायत समिती आणि तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या वतीने आयोजित ३८व्या तालुका विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती अनिल ढिकले यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टी निर्माण होते. निरीक्षण व विचार करण्याची सवय लागते. याशिवाय बालपणापासून संशोधनवृत्ती जोपासली जाते, असे प्रतिपादन ढिकले यांनी या वेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य श्रीरंग वैशंपायन होते. व्यासपीठावर गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी, पंचायत समिती सदस्य शोभा लोहकरे, विनोद लोहकरे, नगरसेवक गणेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी एम. के. भोये, कार्यवाह शशांक मदाने आदी उपस्थित होते. यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचा विषय विज्ञान आणि समाज असा आहे. पहिली ते आठवी आणि नववी ते बारावी अशा दोन गटांत विद्यार्थी व शिक्षकांनी तयार केलेल्या प्रतिकृती तसेच इतर साहित्य निर्मिती मांडण्यात आली आहे. प्रयोगशाळा परिचर यांनीही स्वतंत्र विभागात साहित्य मांडले आहे.
स्वागत मुख्याध्यापिका सी. एम. कुलकर्णी यांनी तर, प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी एम. के. भोये यांनी केले. या वेळी वैशंपायन, मधुकर पवार तसेच विस्तार अधिकारी वंदना चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन दिलीप अहिरे यांनी केले. आभार एन. एन. खैरनार यांनी मानले.   या  वेळी वसुंधरा अकोलकर, आनंदा वाणी, पूजा गायकवाड, सुभाष अहिरे आदी उपस्थित होते.
प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी दुपारी तीन वाजता उपसभापती   कैलास चव्हाण यांच्या हस्ते व मेरी शाळेचे शालेय समिती अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप फडके, प्रकाश भामरे आदी उपस्थित राहणार आहेत.