तपासणी किंवा दोन वेळेस उत्तरपत्रिकेची होणारी तपासणी बंद करून फक्त विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुनर्तपासणी पद्धत सुरू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ व मेडिकल स्टुडंट असोसिएशनच्यावतीने मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात ३०० ते ४०० विद्यार्थी सहभागी झाले असून, या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
आंदोलनकर्त्यांनी उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह उभे करत काही मुद्दे मांडले आहेत. यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य नियमित येणाऱ्या एखाद्या शिक्षकालाच उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी देतात. शिक्षकांना त्यांच्याकडून ही उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर वरिष्ठ किंवा कनिष्ठ शिक्षकाकडे पुढील तपासणीसाठी दिली जाते. दुसऱ्यांदा उत्तरपत्रिका तपासणारे शिक्षक उत्तरपत्रिका न तपासता केवळ एक किंवा दोन गुण कमीजास्त करत ती पुढे पाठवतात. महाविद्यालयाच्या प्राचार्य, तपासणाऱ्या शिक्षकांना जवळपास सर्वाना माहीत असते, की महाविद्यालयात आलेल्या उत्तरपत्रिका त्यांच्या महाविद्यालयाच्या असल्यास संबंधित शिक्षकांना बोलवले जाते आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करतात, असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. महाविद्यालयाचे शिक्षक त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी राहत नाहीत, तसेच दंत महाविद्यालयाचे शिक्षक तर परराज्यात राहतात. या शिक्षकांच्या नावावर आलेल्या उत्तरपत्रिका कोण तपासते, हे गौडबंगाल अद्याप समजले नाही.
अनेक शिक्षक हे त्या त्या शहराचे नामवंत चिकित्सक असल्याने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी त्यांच्या घरी जातात आणि तेच शिक्षक दोन्ही वेळा उत्तरपत्रिका तपासतात. शिक्षक उत्तरपत्रिका तपासणी करताना ‘डीबार्ड’च्या भीतीने तपासणीचे सोपस्कार पार पाडतात, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
तसेच, महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे उत्तरपत्रिका तपासणीसाठी येतात. त्याबरोबर कोणत्या शिक्षकाकडून उत्तरपत्रिका तपासून घ्याव्यात याची यादी आलेली नसते. याचा गैरफायदा प्राचार्याकडून घेतला जातो. दुसरीकडे ही सर्व पद्धत भ्रष्ट असून वेळ खाणारी आहे. यामुळे विद्यापीठाने पूर्वीप्रमाणेच विद्यापीठ परिसरात किंवा काही विभागीय केंद्रात शिक्षकांना निमंत्रित करून उत्तरपत्रिकेची तपासणी करावी. दुसऱ्या उत्तरपत्रिका तपासणीत विद्यापीठाला १५ ते १६ लाख रुपयांचा भरुदड पडतो. विद्यापीठाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुनर्तपासणी केल्यास वेळ व पैसा वाचेल, विद्यापीठ परीक्षा मंडळ, व्यवस्थापन मंडळ, सी नेट सदस्य यांनी नोव्हेंबर १४ मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची पुनर्तपासणी व तपासणी पद्धत बंद करावी.
तपासणीचे नाटक करणाऱ्या शिक्षकांना निलंबित करावे, ज्या महाविद्यालयात हजर नसलेल्या शिक्षकांची हजेरी टाकल्यास त्यांच्यावर कारवाई करावी आदी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या आंदोलनात युवक मराठा महासंघाचे शहराध्यक्ष तुषार जगताप यांच्यासह मेडिकल स्टुडंट्सचे विशाल येडे, विनय आपटे, भागवत शिंदे सहभागी झाले आहेत.