शहरात संततधार सुरू झाल्यानंतर रस्त्यांची चाळण होण्यास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. मागील वर्षी खड्डे बुजविणे व रस्त्यांच्या डागडुजीवर महापालिकेने तब्बल १० कोटी रुपये खर्च केले होते. यंदा हा खर्च दुप्पट म्हणजे जवळपास २० कोटी रुपयांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. दरवर्षी पावसाळ्यात खड्डे बुजविणे व रस्ता दुरुस्तीवर होणाऱ्या खर्चाचा विचार केल्यास पालिकेच्या यंत्रणेला बहुदा खड्डेमय रस्त्यांची प्रतीक्षा असते की काय, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.
पावसाळ्यात खड्डेमय झालेल्या रस्त्यांमुळे वाहनधारकांना ‘डर्ट ट्रॅक रॅली’ची अनुभूती मिळत आहे. या रस्त्यावरून तारेवरची कसरत करताना कधी कुणी दुचाकीस्वार जखमी होतो, तर कुणी हकनाक जिवाला मुकतो. मात्र त्याचे कोणालाच सोयरसूतक नसल्याचा आजवरचा अनुभव. इंटरनेटच्या वाहिन्या टाकण्यासाठी एका बडय़ा कंपनीने उन्हाळ्यात शहरातील प्रमुख रस्ते एका बाजूने खोदून ठेवले. ते काम झाल्यावर मुरूम व माती पसरविण्यात आली. पावसात रस्त्यांचा हा भाग चिखलमय झाला आहे. म्हणजे रस्त्यावरील खड्डे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला चिखलमय परिसर यात वाहनधारकांची कोंडी झाली आहे. काही रस्त्यांची चाळण झाली आहे. गंगापूर रोड ते सोमेश्वर, लेखानगर ते मुंबई नाका, नवीन आडगाव नाका ते हनुमाननगर, सिडको, नाशिक रोड व सातपूर भागात खड्डेमय रस्त्यांमुळे जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
वास्तविक ज्या रस्त्यांवर भरमसाट खड्डे पडल्याचे दिसतात, त्यातील अनेक कामे वर्षभरापूर्वी अथवा दोन ते तीन वर्षांपूर्वी केली गेली असावीत. ठेकेदाराकडे काम सोपविताना तीन ते पाच वर्षे इतकी रस्त्यांची कालमर्यादा निश्चित केली जाते. म्हणजे, या काळात रस्त्याची जी काही दुरवस्था होईल, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असते. कागदोपत्री टाकल्या जाणाऱ्या अटी ठेकेदार कितपत निभावतो आणि महापालिका त्यावर नेमकी काय कारवाई करते, हा संशोधनाचा विषय आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे कालमर्यादेत खडतर बनलेल्या रस्त्यांची दुरुस्ती संबंधितांकडून करवून घेणे क्रमप्राप्त असून त्याकरिता पालिकेला वेगळा निधी खर्च करण्याची गरज नाही. असे असताना दरवर्षी सरसकट सर्वच रस्त्यांच्या डागडुजीचे काम पालिकेची यंत्रणा काही विशिष्ट ठेकेदारांच्या मदतीने करत आहे. मागील वर्षी पावसाळ्यात खड्डे बुजविणे व रस्त्यांच्या डागडुजीवर दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले. या वेळी रस्त्यांची अवस्था अधिक बिकट असल्याने हा खर्च दुप्पट होईल, असा पालिका प्रशासनाचा अंदाज आहे. या कामावर दरवर्षी कोटय़वधींची उधळण होत असल्याने पालिका प्रशासनाला खड्डेमय रस्ते हवेहवेसे वाटतात की काय, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.