विद्युत विभागाच्या कारभारावर स्थायी समितीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी ताशेरे ओढल्यानंतर सभापतींनी त्याची दखल घेत पुढील सात दिवसात या समस्या दूर कराव्यात अन्यथा अधिकाऱ्यांनी खुर्ची सोडावी, अशी तंबी दिली.
स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी स्थायी समितीची बैठक झाली. विद्युत विभागाने २५ लाख रूपये खर्चाचा विद्युतीकरण देखभालीच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला होता.
हा प्रस्ताव सभेसमोर मांडल्याचे पाहून अश्विनी बोरस्ते यांच्यासह काही सदस्य आक्रमक झाले. यापूर्वी स्थायी समितीने या स्वरूपाचे अनेक प्रस्ताव मंजूर केले. परंतु, प्रत्यक्षात विद्युत विभाग काहीच काम करत नसल्याची तक्रार करण्यात आली. महापालिकेने ‘एईडी’चा प्रस्ताव मंजूर केला असताना दुसरीकडे विद्युत विभाग विद्युतीकरणाची कामे काढत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. पथदीप बंद असल्याने अनेक भाग अंधारात असतात. या संदर्भात विद्युत विभागाशी संपर्क साधल्यावर दाद दिली जात नाही.
थातुरमातूर उत्तरे देऊन बोळवण केली जाते. या परिस्थितीत नवनवीन कामे मंजूर केली जातात. मात्र प्रत्यक्षात ही कामे होत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. विद्युत विभागाच्या कारभारावर नोंदविलेले आक्षेप लक्षात घेऊन सभापती धोंगडे यांनी विद्युतीकरणाच्या प्रलंबित समस्या सात दिवसात सोडविण्याचे निर्देश दिले. विहित मुदतीत अधिकाऱ्यांना समस्या सोडविता आल्या नाहीत तर त्यांनी खुर्ची सोडावी, असेही त्यांनी नमूद केले. स्थायी समितीची बैठक याच प्रश्नावरून गाजली. सदस्यांनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली.