अतिक्रमणधारकांना दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सोमवारी आपल्या मोहिमेला नव्याने वेग देत अनधिकृत बांधकामांवर हातोडा घालण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी पाथर्डी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविताना फारसा कोणाचा विरोध झाला नाही. पक्क्या स्वरुपाची बांधकामे, हॉटेलचे शेड, दुकाने, घरे व तत्सम स्वरुपाची अतिक्रमणे कठोरपणे भुईसपाट करण्यात आली. या धडक मोहिमेचा सकारात्मक परिणाम झाला असून वेगवेगळ्या भागात नुकसान टाळण्यासाठी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्याचे सुतोवाच पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्यानंतर प्रदीर्घ काळापासून सुस्तावलेला अतिक्रमण विभाग कार्यप्रवण झाला. एरवी शहरात ही मोहीम म्हणजे पालिकेच्या मालमोटारी अधुनमधून मध्यवस्तीतून फिरून फेरीवाले, छोटय़ा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात धन्यता मानत असे. संबंधितांचा माल जप्त करणे हा एकमेव या विभागाचा कार्यक्रम होता. कधीतरी छोटे-मोठे पक्के बांधकाम पाडून देखावा निर्माण करण्याची संधी कधी सोडली गेली नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांचा वापर वाहतुकीसाठी कमी आणि वाहनतळासाठी अधिक होताना दिसतो. या मार्गावर साकारलेल्या व्यापारी संकुलात नियमाप्रमाणे वाहनतळासाठी जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या जागेचा वापरही व्यावसायिकदृष्टय़ा झाल्यामुळे त्या त्या ठिकाणी जाणाऱ्या ग्राहकांना वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. अस्ताव्यस्त पध्दतीने उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्था नेहमी कोलमडली असते. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी प्रथम ही अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने गंगापूर रस्त्यावरून तिचा श्रीगणेशा झाला. केटीएचएम महाविद्यालय ते गंगापूर गावापर्यंत राबविलेल्या मोहिमेत अतिक्रमणे हटविण्यात आली. पुढील काळात अतिक्रमणधारकांना स्वत:हून अतिक्रमणे काढून घेण्यास मुदत देण्यात आली. अतिक्रमणे हटविताना मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. ते टाळण्यासाठी १८ तारखेपर्यंत स्वत:हून अनधिकृत बांधकामे काढावे, असे आवाहन करण्यात आले. दरम्यानच्या काळात अतिक्रमित बांधकाम ठळकपणे लक्षात यावे म्हणून नगररचना विभागाने संबंधित बांधकामावर लाल निशाण करण्याचे काम सुरू केले.
अतिक्रमणधारकांना दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर साधारणत आठवडाभर थांबलेली मोहीम सोमवारी सुरू झाली. पाथर्डी फाटा ते वडनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर निवासी वस्ती मोठय़ा प्रमाणात आहे. पाथर्डी गाव ते महामार्गापर्यंतच्या चौकापर्यंत वेगवेगळ्या स्वरुपाची अतिक्रमणे दृष्टीपथास पडतात. सकाळी पाथर्डी रस्त्यावर मोहिमेला सुरुवात झाली. जेसीबी्च्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे हटविण्यास सुरुवात झाल्यावर अतिक्रमणधारकांची धावपळ सुरू झाली. नुकसान टाळण्यासाठी काहींनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्याची तयारी दर्शविली. परंतु, विहित मुदत आधीच दिली गेली असताना आता वेळ देता येणार नसल्याचे सांगून पथकाने अनधिकृत शेड्स, पानटपऱ्या, दुकाने भुईसपाट केली.
या मार्गावर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम व्यावसायिकाने रस्त्यालगत नोंदणी कार्यालय थाटले. पक्क्या स्वरुपाचे हे कार्यालयासह, हॉटेलचे शेड तोडण्यात आले. काही दुकानदारांनी आधीच अतिक्रमण काढले होते. परंतु, त्या दुकानांच्या शिल्लक भिंतींवर हातोडा घालण्यात आला. मोठा पोलीस फौजफाटा असल्याने कुठेही विरोध झाला नाही. पाथर्डी गावापर्यंतच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याने स्थानिकांनाही सुखद धक्का बसला.
मोहीम राबविताना पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. कारण आजवर जेव्हा जेव्हा अशी मोहीम राबविली जाते, तेव्हा पुन्हा एकदा जैसे थे स्थिती निर्माण होत असल्याचे दिसते.

लाल निशाणी केलेल्या भागाकडे मोर्चा
नगररचना विभागाने अनधिकृत बांधकामांवर लाल निशाणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे आता अतिक्रमण निर्मूलन विभागाने पुन्हा अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. पुढील काळात ज्या ज्या भागात लाल निशाणींचे काम पूर्णत्वास गेले आहे, तिथे धडक मोहीम राबबिली जाईल. अतिक्रमणधारकांनी नुकसान टाळण्यासाठी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत.
– आर. एस. बहिरम, प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन विभाग