एखाद्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाल्यावर त्याची बदली रद्द होण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे काही प्रकार घडले आहेत; परंतु वरिष्ठांची मर्जी खप्पा झाल्याने एका कर्तव्यकठोर पोलीस कर्मचाऱ्याची अन्यत्र बदली करण्यात आल्याने संतप्त होऊन ग्रामस्थांनी एकत्र येण्याची घटना क्वचितच. अशी घटना येथे घडली असून मुख्यालयात बदली झालेल्या या कर्मचाऱ्यास पुन्हा वणी येथे आणण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत.
दिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस ठाण्यात गुप्तचर विभागात किरण परदेशी हे हवालदार कार्यरत होते. महाविद्यालय, माध्यमिक विद्यालयाबरोबरच वणी बस स्थानक, अशा ठिकाणी टारगटांकडून मुलींना त्रास देण्याचे अनेक प्रकार घडत. दररोज प्रवास करावा लागणार असल्याने तक्रारी करण्यास मुली व पालक फारसे धजावत नाहीत. त्यामुळे टारगटांची भीड चेपली जाऊन विद्यार्थिनींना त्रास देण्याचे प्रकार अधिकच वाढले होते. या संदर्भात काही जणांकडून किरण परदेशी यांना कळल्यावर त्यांनी स्वत: त्यासाठी पुढाकार घेतला. शाळा, महाविद्यालयांसह ठिकठिकाणी थांबणाऱ्या टारगटांच्या घोळक्यांना पोलिसी खाक्या दाखविण्यास त्यांनी सुरुवात केली. रात्रीची गस्त असो किंवा गावातील चोरीचा तपास, त्यातही परदेशी हे पुढाकार घेत असल्याने अल्पावधीत ते वणीकरांमध्ये लोकप्रिय झाले. विद्यार्थिनींसह महिलांसाठी तर ते रक्षकच झाले; परंतु कोणत्या तरी एका कारणावरून परदेशी यांच्यावर वरिष्ठांची मर्जी खप्पा झाली. त्यांची रवानगी पोलीस मुख्यालयात करण्यात आली. यामुळे वणीचे ग्रामस्थ संतप्त झाले असून परदेशी यांना पुन्हा वणी येथे आणण्यासाठी ग्रामसभेत ठराव करण्यात आला. के. आर. टी. हायस्कूल, वणी महाविद्यालय, ग्रामपालिका, जगदंबा ग्रामीण पतसंस्था, श्री सप्तशंृग ग्रामीण पतसंस्था, श्री महासद्र हनुमान सेवा समिती या सर्वाचे संयुक्त निवेदन खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. नरहरी झिरवाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविण्यात आले आहे. एका सामान्य हवालदारासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याची ही जिल्हय़ातील पहिलीच घटना असून वणीकरांच्या भावनांची संबंधितांकडून दखल घेतली जाते की नाही, हा प्रश्नच आहे.