विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्यावतीने सोमवारी वेगवेगळ्या मागण्यांसाठी एकाच दिवशी आंदोलन केल्यामुळे  शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. ओझर विमानतळावर झालेल्या मद्यपार्टीच्या प्रकरणात दोषी अभियंत्याला निलंबित करावे, या मागणीसाठी आपने निदर्शने केली तर ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाविष्ट करावे या मागणीसाठी
ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन तसेच ऑल इंडिया पोस्टल जी. डी.एस एम्प्लॉईज युनियनने मोर्चा काढला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी तसेच मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा या मागणीसाठी नाशिक जिल्हा इ.पी.एफ. पेन्शनर्स फेडरेशनने निदर्शने केली.
ओझर विमानतळावर मद्य पार्टी करणाऱ्या दोषी कार्यकारी अभियंत्याला प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करत त्याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. दोषींवर कारवाई करण्याऐवजी संबंधित अभियंत्यास विनंती बदली देण्यात आल्याचा निषेध करण्यात आला. अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या अभियंत्याविरूध्द फौजदारी कारवाई का झाली नाही असा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला. कार्यकारी अभियंत्यास तत्काळ निलंबित करून त्याच्या संपत्तीची चौकशी करावी, या प्रकरणाशी संलग्न ठेकेदारांचे परवाने रद्द करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच, अतिवृष्टी व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पार कोलमडला आहे. मात्र पालकमंत्र्यांनी त्या भागाची पाहणी केली नाही. निफाडकडे पाठ फिरविणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आपने केली आहे. यावेळी जितेंद्र भावे, प्रियदर्शन भारतीय, स्वप्नील घिया आदी उपस्थित होते.
ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन तसेच ऑल इंडिया पोस्टल जी. डी.एस. एम्प्लॉईज युनियनने ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाविष्ट करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच संपही पुकारला आहे. केंद्र सरकारने माजी न्यायमुर्तीच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांसाठी वेतन पुर्ननिर्धारण समिती स्थापन करण्याची मागणी अमान्य केल्यामुळे तसेच, केंद्र सरकार वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०१४ पासुन लागू करण्यास तयार नाही, ५० टक्के महागाई भत्ता पगारात समाविष्ट केला जात नाही, ग्रामीण डाकसेवकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देता बाहेरून पोस्टमन व एमटीएसची भरती सुरू केली आहे. कर्मचारी विरोधी कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी संघटनेने संप पुकारला आहे. नाशिक पोस्टल विभागात संघटनेचे २८० सभासद त्यात सहभागी झाले. नाशिक, दिंडोरी, सुरगाणा, पेठ, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड तालुक्यांचा समावेश असून त्यातील ८० टक्के कर्मचारी संपावर असून ग्रामीण भागातील पोस्टल सेवा ठप्प आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वेतनात सुधारणा करण्यासाठी माजी न्यायमूर्ती प्रमुख असलेली समिती स्थापन करावी, प्रस्तावीत खासगीकरण थांबवावे आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या. यावेळी आर. एस. जाधव, सुनिल जगताप यांच्यासह अन्य डाकसेवक उपस्थित होते.
गोविंद पानसरे यांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी तसेच मारेकऱ्यांना त्वरीत अटक करावी  या मागणीसाठी नाशिक जिल्हा इ.पी.एफ. पेन्शनर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भाकपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. पानसरे यांच्यावर मागील महिन्यात जीवघेणा हल्ला झाला. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. घटनेला महिना उलटूनही अद्याप मारेकरी मोकाट आहेत. पोलीस विभागाच्या कार्यशैलीचा निषेध करत आंदोलकांनी मारेकऱ्यांना त्वरीत अटक करण्याची मागणी केली.
यावेळी प्रा. राजू देसले, सुधाकर गुजराथी, डी. बी. जोशी, प्रशांत देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. एका पाठोपाठ झालेल्या आंदोलनामुळे मध्यवस्तीतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. सकाळी अकरापासून आंदोलन, मोर्चे व निदर्शनांचे सत्र सुरू झाल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले.