06 July 2020

News Flash

फवारणीच्या चक्रव्युहात द्राक्ष उत्पादक

सलग दोन ते तीन दिवस बसलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने द्राक्षबागा जगविण्यासाठी फवारणी करणे भाग झाले असून ठिकठिकाणी फवारणीत

| March 3, 2015 06:54 am

सलग दोन ते तीन दिवस बसलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने द्राक्षबागा जगविण्यासाठी फवारणी करणे भाग झाले असून ठिकठिकाणी फवारणीत व्यस्त उत्पादक पहावयास मिळत आहेत. पावसाने उघडीप घेतली की, बागांच्या तारा ओढून त्यावरील पाणी झटकणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम झाला आहे. पावसानंतर फवारणीच्या चक्रव्युहात अडकलेल्या उत्पादकांना नेहमीच्या औषधांसाठी एकरी १२०० रुपये तर, महागडय़ा औषधांसाठी एकरी ३००० रुपये खर्च सोसावा लागत आहे. इतके सर्व करुनही तयार झालेला माल हाती येईल याची शाश्वती नाही. निर्यातक्षम द्राक्षांच्या संरक्षणासाठी लावलेले कागद घडांना चिकटून बसले असून त्याचा विपरित परिणाम निर्यातीवरही होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख एकर द्राक्ष क्षेत्र आहे. त्यातील काही बागांना याआधीच गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. पावसाळा संपल्यानंतर नैसर्गिक आपत्तीने अनेकदा तडाखे दिले. त्यात हजारो एकर बागा भऊईसपाट झाल्या. त्यातून बचावलेल्या बागांवर अखेरच्या टप्प्यात पुन्हा हे संकट कोसळले आहे. शनिवारपासून अनेक भागात प्रारंभी रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला. पुढील काळात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वास्तवीक, फेब्रुवारी अखेरीस ऊन जसजसे वाढू लागते, तसतसे द्राक्षांमध्ये साखर उतरण्यास सुरुवात होते. थंडी गायब झाल्यावर द्राक्षांच्या मागणीत वाढ होते. बागांची छाटणी झाल्यानंतर काढणीच्या हंगामापर्यंत बागांची विशेष दक्षता घ्यावी लागते. ऑक्टोबरमध्ये छाटणी झालेल्या बहुतांश द्राक्षबागा मोठय़ा प्रमाणात खर्च करून तयार अवस्थेत असताना ही आपत्ती कोसळली. अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, घसरलेले तापमान अशा तिहेरी संकटाने द्राक्षबागा वेढल्या गेल्या आहेत. विक्री अवस्थेत असणाऱ्या घडांमधील मण्यांची गळ झाली. मण्यांना तडे गेले. पान व घडावर सतत पावसाचे पाणी साचल्याने घडकुजीची समस्या उभी आहे. दुसरीकडे डावणीसारख्या रोगाचा प्रार्दुभाव वाढू लागल्याने रोगप्रतिकारक औषधांच्या फवारणीचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. बागांमध्ये दलदल झाल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे फवारणी करता येणे अशक्य झाले आहे.
या सर्व घटनाक्रमामुळे उत्पादकाचे आर्थिक समीकरण कोसळले आहे. अवकाळी पावसाने उत्पादकाची जीवनशैली बदलून टाकली आहे. पावसाने विश्रांती घेतली की वेली व द्राक्ष घडांवर पाणी साचू नये म्हणून त्यांची कसरत सुरू आहे. बागांच्या तारा ओढून पाणी झटकले जात आहे. फवारणीसाठी लागणारी महागडी औषधे, रासायनिक सेिंद्रय खते, मजुरांची गरज, यंत्रासाठी लागणारे इंधन, कर्जाचा डोंगर यांचा मेळ बसविणे आव्हानात्मक झाले आहे. पाऊस झाला की प्रत्येक वेळी फवारणी करावी लागते. उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार एका एकरसाठी नेहमीच्या औषधांचा फवारणी खर्च एकरी १२०० रुपये तर महागडय़ा औषधांचा खर्च एकरी तीन हजार रुपये आहे. बिघडत्या हवामानामुळे नियमित फवारण्यांपेक्षा अधिक फवारण्या कराव्या लागत असल्याने निर्यातीसाठीची द्राक्ष रेसिडय़ुच्या फासात अडकण्याची काहींना धास्ती आहे. इतका द्राविडी प्राणायाम करून प्रत्यक्ष किती माल हाती येईल याबद्दल साशंकता आहे. द्राक्षांची काढणी होईपर्यंत सर्व काही अधांतरी असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभाग अध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले. अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या बागांचे पंचनामे करून उपयोग नाही. तर, प्रत्यक्षात नुकसानग्रस्त उत्पादकांना कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली आहे.
शेतकरी वर्गाचे पीक आणि मध्यम मुदत कर्जाचे व्याजमाफ करून कर्ज परतफेडीला मुदतवाढ देण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 6:54 am

Web Title: nashik news 27
टॅग Farmers
Next Stories
1 दिवस आंदोलनांचा..
2 स्वाइन फ्लू स्थितीचा आढावा
3 ‘आरटीओ’ कार्यालयात आग; दस्तावेज भस्मसात
Just Now!
X