नाशिक महापालिकेतील घंटागाडी कामगारांना तीन टप्प्यांत कायम सेवेत वर्ग करण्यात यावे आणि इतर प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी नाशिक महापालिका श्रमिक संघाच्या वतीने शुक्रवारी पालिकेच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांना निवेदन दिले. या वेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक रोखून धरली.
महापालिकेतील घंटागाडी कामगारांना तीन टप्प्यांत कायम सेवेत वर्ग करण्यात यावे या कामगार उपायुक्त यांनी २०११ रोजी दिलेल्या पत्राची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी १६ ऑगस्टपासून वेळोवेळी कामगार पालिकेवर धरणे आंदोलन करत आहे. मात्र प्रशासन त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्याचा कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच हजेरी कार्ड-वेतनचिठ्ठी, २१ दिवसांच्या भरपगारी रजा, निम्मे सानुग्रह अनुदान, खतप्रकल्पावर पिण्याच्या पाण्याची सोय, नवीन आलेल्या कामगारांना किमान वेतन अदा केले पाहिजे आदी मागण्या करण्यात आल्या. गाडय़ांच्या देखभालीसंदर्भात अद्याप कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. लोकशाही पद्धतीने चाललेल्या आंदोलनाची कोणतीही दखल घेत नसल्याने ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा संघाने दिला आहे. या वेळी उपाध्यक्ष महादेव खुडे यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.