गॅस सिलिंडर अनुदानासह अनेक सेवा ‘आधार’शी जोडण्यात येत असताना ज्यांनी अद्याप आधार कार्ड नोंदणी केलेली नाही, अशा नागरिकांच्या सोयीसाठी शहरात आधार कार्ड नोंदणी करणे गरजेचे आहे. अनेक दिवसापासून आधारकार्ड नोंदणी बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून आधार कार्ड नोंदणी केंद्रांची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात यावीत, असे आवाहन युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
आधार क्रमांक सध्या बहुतेक ठिकाणी आवश्यक झाला आहे. बँकेशी संबंधित अनेक योजनांसाठी आधार क्रमांकाची नोंद अत्यावश्यक करण्यात आली आहे. आधार क्रमांक असल्याशिवाय पुढील कार्यवाही होत नसल्याने आधार क्रमांक मिळविण्यासाठी नागरिकांमध्ये सजगता आली आहे. याआधी आधार क्रमांकाची सक्ती आहे किंवा नाही याविषयी शासनाकडूनच संभ्रम निर्माण करणारी माहिती देण्यात येत आल्याने आणि त्यातच न्यायालयानेही आधार क्रमांकाची सक्ती करणे योग्य नसल्याचे बजावल्यानंतर अनेकांनी आधार नोंदणीकडे पाठ फिरवली. त्यामुळे शहरात सुरू असणारी अनेक आधार नोंदणी केंद्रे बंद करण्यात आली. परंतु आता गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान बंकेत जमा करण्यासाठी तसेच इतर अनेक शासकीय योजनांसाठी आधार क्रमांकाची मागणी करण्यात येऊ लागल्याने ज्या नागरिकांनी अद्याप आधार क्रमांकासाठी नोंदणी केलेली नव्हती, तेही आता आधार क्रमांक नोंदणीसाठी पुढे येऊ लागले आहेत. याआधीची अनेक केंद्रे बंद झाल्याने नाशिकमध्ये सध्या फक्त एकाच ठिकाणी आधार कार्ड नोंदणी सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
या एकमेव केंद्रावर नागरिकांची गर्दी होऊन आधार कार्ड नोंदणीला विलंब होत आहे. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक नोंदणीसाठी त्या त्या विद्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा याआधी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. परंतु त्या घोषणेनुसार कार्यवाही झालेली नाही. तसे झाले असते तर विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नोंदणीचा प्रश्नच निकाली निघाला असता. अद्यापही या घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय शहरातील बंद असलेली आधार केंद्रे सुरू करणे, विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळण्यासाठी विशेष व्यवस्था करणे, काही नागरिकांनी सहा महिन्यांपासून आधारकार्ड नोंदणी केलेली असूनही त्यांना अद्याप क्रमांक मिळालेला नाही. ज्या संस्था पैसे घेऊन आधार नोंदणीचे काम करत आहेत, त्यांच्याविरूध्द त्वरित कारवाई करण्यात यावी, आधारकार्ड नोंदणीसाठी अधिकाधिक केंद्र सुरू करावीत, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
या मागण्यांवर त्वरीत कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दीपक दातीर, समन्वयक सचिन बांडे, उमेश चव्हाण, सुनील जाधव, उपविभाग प्रमुख नाना काळे, अंकुश राऊत आदींनी दिला आहे.