नाशिकरोड येथे सिन्नरफाटा परिसरात किरकोळ वादातून गोळीबार..पंचवटीत क्रांतीनगरमध्ये युवकाचा पाठलाग करून गोळीबार..गोरेवाडीत किरकोळ वादातून युवकाचा खून..मुंबई नाका परिसरात वाहतूक पोलिसाला मारहाण..एका दिवसात सोनसाखळी हिसकाविण्याचे तीन प्रकार..
या सर्व घटना केवळ दोन दिवसातील. शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा आलेख दर्शविण्यास या घटना पुरेशा आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यापासून शहरात गुन्ह्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तोपर्यंत कर्तव्यनिष्ठ आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात कठोर म्हणून आपली छाप नाशिककरांवर पाडण्यात यशस्वी झालेले पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल हे वाढत्या गुन्ह्यांमुळे पूर्णपणे हतबल झाले आहेत की काय असे वाटावे इतपत परिस्थिती बिकट झाली आहे. पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा वचक राहिला नसल्याने किरकोळ कारणातून हाणामाऱ्या हे तर  नाशिककरांना सवयीचे झाले आहेच. परंतु आता अशा घटनांमध्ये अगदी सहजपणे गोळीबारही होऊ लागल्याने नाशिककरांना गोळीबाराचा आवाजही आता सवयीचा करून घ्यावा लागणार, असेच दिसते. परिस्थिती इतकी हाताबाहेर जात असतानाही आणि ‘हिरो’पासून आपली प्रतिमा आता ‘झिरो’ कडे वळू लागली असतानाही सरंगल हे शांत असल्याने नाशिककरांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. याआधी गुन्ह्याचे गंभीर प्रकार घडल्यावर कोम्बिंग ऑपरेशनसह ठिकठिकाणी वाहन तपासणी मोहीम राबविणारे सरंगल यांची भूमिका काही महिन्यांपासून एकदमच या शहरापासून अलिप्त झाल्यासारखीच दिसत आहे. सरंगल यांनी नाशिकची सूत्रे हाती घेतली तेव्हांही पोलीस बळ कमीच होते. तरीही त्यांनी अपुऱ्या पोलीस बळाच्या जोरावर गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे पोलीस बळ कमी असल्याचे कारणही त्यांना आता देता येणार नाही.
नाशिकरोड, सिडको, गंगापूररोड परिसरातील नागरिकांकडून वाढत्या गुन्ह्यांच्या पाश्र्वभूमीवर डी. एस. स्वामी, गणेश शिंदे यांसारख्या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा बोलविण्याची मागणी होऊ लागली आहे. याचाच अर्थ त्यांच्या जागी आलेल्या अधिकाऱ्यांना आपली कोणतीही छाप पाडता आलेली नाही. स्वामी, शिंदे यांच्या कर्तबगारीमुळे त्यांची नावे सर्वसामान्य नाशिककरांच्या ओठांवर रूळली होती. परंतु आता नवीन कोण अधिकारी आपल्या भागासाठी आले आहेत, तेच नागरिकांना माहीत नाही. असे जर असेल तर हे अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.
विशेष म्हणजे याआधी नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीविरोधात आवाज उटविणारे सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी सध्या गप्प आहेत. आघाडी सत्तेवर असताना याप्रश्नी रस्त्यावर उतरणारी युती आता सत्तेवर आहे. शहरात सत्ताधारी भाजपचे तीन आमदार असताना त्यापैकी एकाही आमदाराने गुन्हेगारीच्या प्रश्नावर तोंड उघडल्याचे दिसत नाही. शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना आमदारांनी चुप्पी नाशिककरांच्या आकलनापलीकडील आहे. मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही या विषयावर गप्प राहाणेच पसंत केले आहे. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करावी, या मागणीसाठी डाव्या आघाडीने अलीकडे मोर्चा काढणे आणि निदर्शने केली आहेत.
नाशिक शहरातील परिस्थितीविषयीही त्यांनी अशी भूमिका घेणे आवश्यक आहे. छगन भुजबळ पालकमंत्री असताना शहरातील गुंडगिरीविरोधात आवाज उठविणाऱ्यांचा आवाज आता एकदमच कसा क्षीण झाला, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.
दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सूक्ष्म नियोजनात मग्न असणारे आयुक्त सरंगल सध्या शहरात काय घडत्येय त्याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ आहेत की काय, असेही नाशिककरांना वाटू लागले आहे.