महाराष्ट्र शासनाकडून नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी अद्याप मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडे निधी सुपूर्द न केल्याने सिंहस्थापूर्वी स्थानक कात टाकण्याची शक्यता कमीच आहे, असे मत नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व रेल्वे सल्लागार समितीे सदस्य सुरेंद्रनाथ बुरड यांनी व्यक्त केले आहे.
नाशिकरोड रेल्वे स्थानकात फलाटांची संख्या तीनवरून चार करणे, सिन्नर आणि शिर्डीकडून येणाऱ्या प्रवाशांना कमी वेळेत रेल्वे स्थानकात येण्यासाठी पूर्व बाजूला रेल्वेचे सर्व सोयींनीयुक्त रेल्वेचे प्रवेशव्दार, वाहनतळ, तिकीट कार्यालय तसेच नाशिकरोडसह मनमाड रेल्वे स्थानकात एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करण्यासाठी सरकत्या जिन्यांची निर्मिती, प्रवाशांनी रेल्वे पुलाचाच वापर करावा यासाठी काटेरी कुंपणाची निर्मिती तत्काळ करण्याची मागणीही बुरड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
कुर्ला-निजामुद्दीन एक्स्प्रेस, कुर्ला-हरिद्वार वातानुकुलीन एक्स्प्रेस, हैदराबाद-अजमेर एक्स्प्रेस, बंगळूरू-अहमदाबाद एक्स्प्रेस या साप्ताहिक गाडय़ांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडय़ा दैनंदिन सुरू कराव्यात. मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस तसेच मुंबई-भुसावळ पॅसेंजरला तीन जादा सर्वसाधारण डबे जोडण्यात यावेत, भुसावळ ते मुंबईकरिता सहा तासात पोहोचणारी जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी सुरू करावी, भुसावळ-पुणे एक्स्प्रेसने ये-जा करणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी क्रमश: नांदगाव, लासलगाव, निफाड येथे थांबा द्यावा, मनमाड-कुल्र्याकडे ये-जा करणाऱ्या महत्वाच्या तीन गाडय़ांचा मार्ग सीएसटीपर्यंत वाढविण्यात यावा, असेही निवेदनात बुरड यांनी नमूद केले आहे.
सुशोभिकरणासह सौजन्यही आवश्यक
सिंहस्थात देश-विदेशातून नाशिक येथे लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने आणि त्यातील बहुतेक जण रेल्वेमार्गेच येणार असल्याने नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण आवश्यक झाले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांना नाशिककरांकडून सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी स्थानकाबाहेर उभ्या राहणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना सौजन्यशील वागण्याचे धडे देण्याची गरज आहे. नाशिकरोड ते शालिमार या दरम्यान रात्रीच्या वेळी रिक्षा चालकांकडून लूट होण्याचे प्रकार वारंवार होत असतात. सिंहस्थात असे प्रकार घडल्यास भाविकांची लूटमार करणारे शहर अशी नाशिकची ओळख निर्माण होईल. तसे होऊ नये म्हणून रेल्वे स्थानक परिसरातील टॅक्सी व रिक्षा चालकांना सिंहस्थ कालावधीत विशिष्ट प्रकारचे ओळखपत्र देण्यात यावे, तसेच हे ओळखपत्र आणि गणवेश त्यांच्यासाठी सक्तीचा करण्याची गरज आहे. लूट करणाऱ्या रिक्षा चालकांमुळे प्रामाणिक रिक्षाचालकही बदनाम होत असल्याने विविध पक्षांच्या टॅक्सी व रिक्षा संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.