दहावीच्या परीक्षेत नाशिक विभागीय मंडळात मागील पाच वर्षांत यंदा सर्वाधिक म्हणजे ९२.१६ टक्के निकालाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक निकाल नाशिक (९२.८३) तर सर्वात कमी निकाल धुळे जिल्ह्याचा (९१.३६) लागला. परीक्षेला बसलेल्या १ लाख ९२ हजार पैकी १ लाख ७९,९९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात पुन्हा एकदा मुलींचे वर्चस्व कायम राहिले. यंदाच्या निकालाचे वैशिष्ठय़े म्हणजे, विभागातील ५४८ माध्यमिक शाळांचा १०० टक्के निकाल आणि ३० टक्क्यांपेक्षा कमी निकालाच्या शाळांची दोनवर आलेली संख्या. गुणपत्रिकांचे वितरण शाळांमार्फत १५ जूनला म्हणजे सोमवारी दुपारी तीन वाजता होणार आहे.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी सकाळपासून विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू होती. दुपारी एकच्या सुमारास ऑनलाईन निकाल जाहीर झाला. तत्पुर्वी, संबंधितांनी संगणकासमोर ठाण मांडून निकाल पाहण्याची तजविज केली होती. इंटरनेट कॅफेचालकांनी प्रती विद्यार्थी १५ ते २५ रुपये आकारात आपले उखळ पांढरे करून घेतले. नाशिक विभागाने पाच वर्षांत सर्वाधिक निकालाची नोंद केली असल्याचे मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात ७९३८२, धुळे २५३३५, जळगाव ५४९४९, नंदुरबार १७३३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी यंदाही अधिक राहिली. विभागात १ लाख ६९७५ विद्यार्थ्यांपैकी ९७०२१ (९०.७० टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींचे हे प्रमाण ९८०८८ पैकी ७९९७७ (९३.९९ टक्के) उत्तीर्ण असे आहे. गतवर्षी नाशिक विभागाचा ९१.५८ टक्के निकाल होता.
यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ८४४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. तर प्रथम श्रेणीत ७६४६७, द्वितीय ४४८५७, पास श्रेणीत ६८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ज्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विहित नमुन्यात २५ जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेत ऑक्टोबर २०१५ व मार्च २०१६ मध्ये संधी उपलब्ध असल्याचे मंडळाने म्हटले आहे. उत्तर पत्रिकेच्या छायाप्रती मागणी केल्यास उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी २९ जूनपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे हे तिसरे वर्ष होते. विद्यार्थी, शिक्षक यांना त्याचा सराव झाला असून त्यामुळे निकाल उंचावल्याचे मत जगताप यांनी व्यक्त केले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीच्या जागा कमी
दहावीच्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यात तब्बल ७९३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी अकरावीसाठी ७१२४० जागा उपलब्ध आहेत. तसेच आश्रमशाळांमध्ये अकरावीच्या पाच हजार जागा आहेत. म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीच्या ३१४२ जागा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक जिल्ह्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीची प्रवेश क्षमता कमी दिसत असली तरी तंत्रनिकेतन पदविका, आयटीआय आदी शाखांमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. यामुळे अकरावीच्या उपलब्ध जागा काही अंशी रिक्त राहू शकतील, अशी शक्यता विभागीय सचिव आर. आर. मारवाडी यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात एकूण ३४५ महाविद्यालये आहेत. त्यात कला शाखेच्या ३४ हजार २४०, विज्ञान २१ हजार ९६०, वाणिज्य शाखा १३ हजार १६० तर संयुक्त अभ्यासक्रमाच्या १८८० अशा एकूण ७१ हजार २४० जागा उपलब्ध आहेत. तसेच २९ आश्रमशाळांमध्ये अकरावीची पाच हजार प्रवेश क्षमता आहे. नाशिक शहरातील महाविद्यालयात अकरावीसाठी २०, ८६० प्रवेश क्षमता आहे. त्यात कला शाखेच्या ४७६०, विज्ञान ८०२०, वाणिज्य ७६०० तर संयुक्तच्या ४८० जागांचा समावेश आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शिक्षण विभागाने ११ जून रोजी चांदवड येथे जिल्ह्यातील सर्व प्राचार्याची बैठक बोलावली आहे. चांदवडच्या नेमीनाथ जैन महाविद्यालयात ही बैठक होईल. अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या कार्यपध्दतीबाबत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
३० टक्क्यांहून कमी निकालाच्या दोन शाळा
चार वर्षांपूर्वी विभागात ३० टक्केपेक्षा कमी निकाल लागणाऱ्या शाळांची १३७ वर असणारी संख्या माची २०१५ मध्ये केवळ दोन शाळांवर आली आहे.
२०१३ मध्ये ही संख्या २५ शाळा इतकी होती. मार्च २०१४ च्या परीक्षेत इतका कमी निकाल लागणाऱ्या ४ शाळा होत्या. यंदा त्यातही निम्म्याने घट झाली आहे.
शंभर टक्के निकालाच्या ५४८ शाळा
कमी निकालाच्या शाळा लक्षणियरित्या कमी झाल्या असताना दुसरीकडे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणाऱ्या शाळांची संख्या वाढली आहे. यंदा विभागात एकूण ५४८ माध्यमिक शाळांचा १०० टक्के निकाल लागला. गतवर्षी हे प्रमाण ४५१ इतके होते. मार्च २०१४ मध्ये २९५, मार्च २०१२ मध्ये हे प्रमाण २३१ शाळा होते.
१३२ कॉपीबहाद्दरांना शिक्षा
माध्यमिक शाळांत परीक्षेत १३२ विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला असून त्यांना शिक्षासुचीनुसार शिक्षा करण्यात आली आहे. त्यात नाशिकचे ६२, धुळे २३, जळगाव ४५ व नंदुरबारच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.