सय्यदपिंप्री येथे नऊ जानेवारी रोजी नाशिक तालुका क्रीडा संकुलाचे आणि दुसऱ्या दिवशी वावी-शिर्डी रस्त्याच्या रूंदीकरणासह विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ, खा. समीर भुजबळ आणि स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तालुका क्रीडा संकुलासाठी तीन कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या संकुलामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंची सोय होणार आहे. मोहाडी-सय्यदपिंप्री-लाखलगाव- शिंदे रस्ता दुरूस्ती, लाखलगावजवळ गोदावरी नदीवर पूल, पिंपळगाव-वणी-सापुतारा यांसह इतरही रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. या कामांना गुरूवारी सुरूवात करण्यात येणार आहे. शुक्रवारीही काही कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. त्यात वावी ते शिर्डी रस्ता तीनपदरी कामाचा समावेश आहे. त्यासाठी २६ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. सिन्नर ते वावी या दरम्यान हा रस्ता यापूर्वीच तीनपदरी झाला आहे.