मागील दहा दिवसांत तापमानातील चढ-उताराची शृंखला थांबली असून नाशिक शहर व परिसर आता गुलाबी थंडीच्या दुलईत लपेटले गेल्याचे चित्र आहे. मागील तीन दिवसांपासून सातत्याने खाली जाणाऱ्या तापमानाने सोमवारी हंगामातील नीचांकी पातळी गाठली. या दिवशी सकाळी ६.१ अंशाची नोंद झाली. बोचऱ्या वाऱ्यामुळे दिवसा व रात्री गारवा असल्याने सर्वाना हुडहुडी भरली आहे. नववर्षांचे स्वागत देखील कडाक्याच्या थंडीत करावयास मिळण्याची चिन्हे आहेत. थंडीची लाट पुढील काही दिवसात कोणती पातळी गाठते याबद्दल उत्सुकता आहे.
उत्तर महाराष्ट्रात सलग दोन ते तीन दिवसांपासून वातावरणाचा नूर पालटला आहे. साधारणत: १५ डिसेंबरला नाशिकचे तापमान कमी चांगलेच खाली आले होते. १५ डिसेंबर रोजी शहरात सर्वात कमी म्हणजे ६.३ अंशाची नोंद झाली. परंतु, त्यानंतर पुन्हा काही दिवस थंडी गायब झाली.
यामुळे वातावरणात बदल झाले असताना मागील तीन दिवसात गारव्याने आपले अस्तित्व ठळकपणे दाखवायला सुरूवात केली.  शनिवारी ७.२ अंशावर असणारा नाशिकचा पारा सोमवारी ६.१ अंशावर येऊन स्थिरावला. सध्या उत्तर भारतात बर्फवृष्टी व थंडीची लाट असल्याने त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रातील वातावरणावर पडला आहे. कडाक्याची थंडी दाखल झाल्याने सर्वाना हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. त्यातच, गार वारा वहात असल्याने दिवसभर उबदार कपडे परिधान करणे भाग पडले आहे. थंडीच्या लाटेने सगळे वातावरण जणू गोठवून टाकले आहे.
सध्याच्या वातावरणात सलग तीन ते चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. एरवीच्या तुलनेत जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुमारास नीचांकी पातळी गाठणारे तापमान यंदा डिसेंबरच्या अखेरीसच त्या पातळीवर पोहचले. मागील दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर नजर टाकल्यास उत्तर महाराष्ट्रात तापमानाची खरी घसरण ही प्रामुख्याने जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये झाल्याचे दिसते. यंदा, मात्र , २९ डिसेंबर रोजी नाशिकच्या तापमानाने हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद केली. महत्वाची बाब म्हणजे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणार असून या दरम्यान तापमान आणखी खाली जाण्याचा संभव असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. गत दहा वर्षांत दोन वेळा नाशिकचे तापमान ५ अंश अथवा त्याखाली गेले आहे. सध्याची स्थिती पाहता यंदाच्या हंगामात तापमान ही पातळी गाठेल काय, असा प्रश्न सर्वाना पडला आहे. याआधी २००२ मध्ये ५ अंश तर २००८ मध्ये ३.५ अंश तापमानाची नोंद झाली होती. यंदाची स्थिती पाहता तापमान त्या दिशेने मार्गक्रमण करू शकते.
सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नववर्षांचे स्वागत देखील थंडगार वातावरणात करावयास मिळणार आहे. दुसरीकडे घसरत्या तापमानाचा फटका द्राक्षाला बसण्याची भीती आहे. गेल्या काही दिवसांपासून असणाऱ्या कमालीच्या गारठय़ाने द्राक्षवेलींचे काम मंदावले आहे. यामुळे द्राक्षमण्यांच्या आकारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थंडी कायम राहिल्यास आणि आद्र्रतेचे प्रमाण द्राक्षमणी फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.