नाशिक पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस दलाच्या अनुक्रमे ४७१ आणि १९२ शिपाई पदांच्या जागांसाठी शुक्रवारी शारीरिक चाचणीद्वारे भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी ही प्रक्रिया राबविली जात असल्याने उमेदवारांनी ग्रामीण पोलिसांच्या तुलनेत शहर पोलीस दलास अधिक पसंती दिल्याचे लक्षात आले. कारण, ग्रामीण पोलिसांनी पहिल्या दिवशी बोलाविलेल्या ८२५ पैकी केवळ ३६४ उमेदवार सहभागी झाले. शहर पोलीस दलात हे प्रमाण तुलनेत चांगले होते. ९०० पैकी ६१२ उमेदवार भरतीच्या पहिल्या टप्प्यात सहभागी झाले. छाती व उंचीचे विहित निकष पूर्ण न करणाऱ्या दोन्ही ठिकाणच्या एकूण २२५ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले.
नाशिक पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण पोलीस दलासाठी शासनाने नव्याने मंजूर केलेल्या शिपाई पदांसाठी अनुक्रमे शहरातील पोलीस कवायत मैदान व आडगावच्या ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरुवात झाली. आयुक्तालयातील ४७१ शिपाई जागांसाठी तब्बल १२ हजार, तर ग्रामीण पोलीस दलात १९२ जागांसाठी ८०२५ अर्ज आले आहेत. काही उमेदवारांनी दोन्ही ठिकाणी अर्ज भरलेला असल्याने आणि दोन्ही ठिकाणी ही प्रक्रिया एकाच दिवशी सुरू झाल्याने अशा उमेदवारांची अडचण झाली. पोलीस आयुक्तालयाने प्रत्येक दिवशी ९००, तर ग्रामीण पोलिसांनी ८२५ उमेदवारांना बोलाविले. पोलीस कवायत मैदानावर गंगापूर रस्त्यावरील प्रवेशद्वाराने शेकडो उमेदवार जमा झाले. काही जणांचे पालकही समवेत होते. यावेळी उमेदवारांना ‘पोलिसी खाक्या’ म्हणजे नेमके काय याची जाणीव झाली. कारण उमेदवार व पालकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करणारे पोलीस कर्मचारी करडय़ा आवाजात त्यांना सुनावत होते.
या भरतीसाठी उपस्थित होताना उमेदवारांनी आपली मूळ शैक्षणिक कागदपत्रे, रहिवासी दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र व आवश्यक ती संपूर्ण कागदपत्रे आणावीत, असे आधीच सूचित करण्यात आले होते. भरती प्रक्रियेसाठी प्रत्येकाला प्रवेशपत्रही देण्यात आले होते. या पत्राची छाननी करून उमेदवारांना मैदानात प्रवेश देण्यात आला. प्रारंभी प्रत्येक उमेदवाराची उंची व छातीचे मोजमाप घेण्यात आले. त्यात निकष पूर्ण न करणाऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. निकषात बसलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. काही जणांकडे सर्व कागदपत्रे नव्हती. त्यांना पुन्हा आणण्यास सांगण्यात आले. कागदपत्रांची छाननी झालेल्या प्रत्येकाला क्रमांक देऊन शारीरिक चाचणीला सुरुवात झाली. १०० मीटर धावणे, गोळाफेक, जोर-बैठका व लांब उडी यांची क्षमता जोखण्यात आली. याशिवाय पुरुष उमेदवारांना पाच किलोमीटर, तर महिला उमेदवारांना तीन किलोमीटर धावण्यातही सहभागी व्हावे लागणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस. आर. ठाकूर यांनी सांगितले. उमेदवारांच्या गटागटाने चाचण्या झाल्यामुळे दिवसभर ही प्रक्रिया सुरू होती. शहर पोलीस भरतीत पहिल्या दिवशी उंची व छातीचे निकष पूर्ण न करणारे १२० जण अपात्र ठरल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
ग्रामीण पोलीस दलाची भरती प्रक्रिया आडगाव येथील मुख्यालयातील मैदानावर झाली. पहिल्या दिवशी बोलाविलेल्या एकूण उमेदवारांपैकी ५५ टक्के उमेदवारांनी दांडी मारली. शहर व ग्रामीण या दोन्ही दलातील भरतीसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहर पोलिसांच्या भरतीत प्राधान्य दिल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ३६४ उमेदवार भरतीसाठी हजर झाले. त्यात छाती व उंचीचे विहित निकष पूर्ण न करू शकणाऱ्या १०५ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील भरतीच्या पहिल्या टप्प्यातील शारीरिक चाचणीचा टप्पा १७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. पोलीस आयुक्तालयातील भरतीची प्रक्रिया उमेदवारांच्या मोठय़ा संख्येमुळे १५ ते १६ दिवस चालू शकते. शारीरिक चाचणीचा टप्पा झाल्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीत समाविष्ट झालेल्या उमेदवारांची अखेरच्या टप्प्यात लेखी परीक्षा होणार आहे.
आडगावमधील एका रस्त्यावरील वाहतुकीवर र्निबध
ग्रामीण पोलीस दलातर्फे राबविल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेंतर्गत उमेदवारांची पाच किलोमीटर रस्त्यावर धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे. आडगाव पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूने नगरसेवक अ‍ॅडव्होकेट शिंदे यांच्या घरापासून पुढे जाणाऱ्या तीन किलोमीटपर्यंतच्या मार्गावर ही चाचणी होईल. यावेळी कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला अडथळा होऊ नये, तसेच अपघातामुळे काही घटना घडू नये यासाठी उपरोक्त मार्गावर भरती प्रक्रियेच्या काळात हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. २१ जून २०१४ पर्यंत हे र्निबध लागू राहतील, असे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी म्हटले आहे. हे र्निबध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत.