जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलात झालेल्या १९ वर्षांआतील शालेय बॅडमिंटन नाशिक विभागीय स्पर्धेत येथील एचपीटी व आरवायके कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी अप्रतिम खेळ करीत विजेतेपद मिळविले.
धुळे ग्रामीण संघाला एकेरी व दुहेरीत नमवित नाशिक मनपाने विजय संपादन केला. त्यानंतर नाशिक ग्रामीणला पराभूत केले. मुलांचा अंतीम सामना नाशिक मनपा विरुद्ध जळगाव मनपा यांच्यात अतिशय चुरशीचा झाला. एकेरीत चैतन्य गांगलने २-१ असा विजय मिळविला. दुहेरीत चैतन्य व रोहित भायभंग यांनी २-१ अशी विजयश्री मिळविली. तत्पूर्वी विपुल शिंदेने धुळे ग्रामीणविरुद्ध एकेरी व दुहेरीत रोहितबरोबर उत्कृष्ठ खेळ केला. परंतु मांडय़ाचे स्नायू दुखावल्याने नंतरच्या सामन्यात त्याला विश्रांती घ्यावी लागली. उपांत्य फेरीतच्या सामन्यात स्वरुप वायकोले व सिद्धार्थ खोंड यांनी आपआपले सामने जिंकले. आरवायकेच्या मुलींच्या संघाला तिसरे स्थान प्राप्त झाले. पुढील राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा २५ नोव्हेंबरपासून नांदेड येथे होणार आहे.