एलायझा ही एचआयव्ही जंतुसंसर्ग तपासणी चाचणी केल्यानंतरही काही वेळा दोष आढळून येत नाही. मात्र, नॅट चाचणी केल्यानंतर जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण जवळपास संपते. शहरातील दत्ताजी भाले रक्तपेढीत नॅट चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली. अशा प्रकारची सुविधा असणारी देशातील ही अकरावी, तर महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांमधील पहिलीच रक्तपेढी आहे. या चाचणीमुळे सर्वाधिक सुरक्षित रक्त देता येऊ शकेल, असा दावा शुक्रवारी करण्यात आला.
नॅट चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामुग्रीचे उद्घाटन माजी खासदार मोरेश्वर सावे यांच्या हस्ते नुकतेच झाले. नॅट चाचणीच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास कॅलिफोर्नियातील डॉ. जॉन सलढाणा यांच्या उपस्थितीत परिषद घेण्यात आली. रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतरही काही जंतुसंसर्ग दिसून येत नाही. रक्त संक्रमणामुळे अन्य व्यक्तींना त्याची लागण होण्याची शक्यता असते. रक्त संक्रमणामुळे एचआयव्ही जंतू संसर्गाचे लागण होण्याचे प्रमाण ०.७ ते ३ टक्के आहे. नव्या अभ्यासानुसार ही टक्केवारी घटत चालली आहे.
कारण जंतुसंसर्ग शोधण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. नॅट ही चाचणी सुरक्षित रक्तासाठी महत्त्वाची असल्याचे डॉ. सलढाणा यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. भारतात ऐच्छिक रक्तदात्यांची संख्या पूर्वी कमी होती. ती वाढू लागली आहे. परदेशात वारंवार रक्तदान करणाऱ्या दात्यांची संख्या अधिक आहे. पैसे मोजून रक्तदान करवून घेणे हे कधीही धोकादायक असते. नॅट चाचणीमुळे सर्वाधिक सुरक्षित रक्त मिळण्याची शक्यता अधिक आहे. कमी खर्चात ही सोय दत्ताजी भाले रक्तपेढीत उपलब्ध केली आहे. देशात रक्तदानासाठी महाराष्ट्र अग्रेसर आहे. दरवर्षी १४ लाख रक्तदान होते. सुरक्षित रक्त ही गरज असल्याने नॅटची चाचणी उपयोगी पडू शकते. रुग्णांच्या नातेवाइकांना या अनुषंगाने माहिती देऊन तेच रक्त संक्रमणासाठी वापरले जावे, असे प्रबोधनही रक्तपेढीतील कर्मचारी करतात, असे रक्तपेढीचे प्रमुख डॉ. महेंद्रसिंह चौहान यांनी सांगितले. कार्यक्रमास अनिल भालेराव, श्रीनिवास मूर्ती, कैजाद वाडिया आदींची उपस्थिती होती. या वेळी सुरक्षित रक्तासाठीचे नॅटचे बोधचिन्हही ठरविण्यात आले.