५९वी शालेय, १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेस शुक्रवारपासून सद्गुरू ओम गुरुदेव विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्टच्या (कोकमठाण, कोपरगाव) इंटरनॅशनल स्कूलच्या विस्तीर्ण मैदानावर सुरू होत आहेत. स्पर्धेत देशभरातून मुले व मुलींचे २३ राज्यांतील संघाचे, पाचशेहून अधिक खेळाडू, पंच, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक व अधिकारी सहभागी होत आहेत. स्पर्धा दि. २०पर्यंत चालतील.
जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा बेसबॉल संघटना व जंगली महाराज ट्रस्ट यांनी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली आहे. सुसज्जतेमुळे ट्रस्टच्या मैदानावर खो-खोपाठोपाठ लगेच बेसबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून खेळाडू व इतरांची निवासाची, रेल्वेस्थानकाहून नेण्या-आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंना अखिल भारतीय खेळ प्राधिकरणच्या सूचनेनुसार आहार दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी तीन मैदाने सुसज्ज करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे प्राचार्य डी. एन. सांगळे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
सांगळे यांच्यासह ट्रस्टचे व्यवस्थापक रमेश भणगे, राज्य संघटनेचे सचिव, महाराष्ट्र संघाचे कोच राजेंद्र इखणकर (मुंबई) व राजेंद्र बनसोड, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे, सचिव मकरंद कोऱ्हाळकर, उपाध्यक्ष सुधीर चपळगावकर, मिलिंद थोरे, क्रीडा अकादमीचे प्रमुख पाळणे, क्रीडा संचालक अशोक कांगणे आदींनी स्पर्धेची व मैदानांची पाहणी केली. याच मैदानावर सध्या राज्य मार्गदर्शक इखणकर व बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघाचे शिबिर सुरू आहे.
महाराष्ट्राकडून अपेक्षा
महाराष्ट्राच्या संघात यंदा रोहन फडके (शेवगाव, आबासाहेब काकडे विद्यालय), सिद्धेश बडवर (आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल) व तेजश्री ताजने (अभिनव पब्लिक स्कूल, अकोले) या तिघांचा समावेश आहे. राज्याचे दोन्ही संघ यंदा विजेतेपदाच्या स्पर्धेत असल्याचा विश्वास मार्गदर्शक इखणकर व बनसोड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.