एकदा पीएच.डी.साठी नोंदणी केल्यानंतर वर्षांनुवर्षे खपून तयार केलेला शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केल्यानंतरही दोन वर्षे पीएच.डी. पदवी प्राप्त होत नसेल तर पीएच.डी.धारक भडकणारच, अशा भडकलेल्या धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने विद्यापीठ प्रशासनाला खडे बोल सुनावले.
धनवटे नॅशनल महाविद्यालयातील प्रा. मनीष वानखेडे हे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पीएच.डी. शोधप्रबंधासंबंधी आत्ताच्या स्थितीबाबतची माहिती करून घेण्यासाठी परीक्षा भवनातील पीएच.डी. कक्षात आले. त्यावेळी दुसरे एक प्राध्यापक पीएच.डी. संदर्भात विचारपूस करीत होते. तेथील लिपिकाने ताबडतोब त्यांची फाईल काढून देण्याचे आश्वासन देताच जवळच उभे असलेले डॉ. वानखेडे जाम भडकले. ते बऱ्याच वेळपासून विचारपूस करीत होते. त्यांच्या मते माझी फाईल काढायला लिपिकांना वेळ नाही, पण दुसऱ्या प्राध्यापकाचे लांगूनचालन होत आहे. त्यामुळे त्यांनी विद्यापीठ वर्तुळातील कारभारावर संताप व्यक्त केला.
‘मला फाल्तू कारणे सांगू नका. माझे काम करायला तुम्हाला वेळ नाही. नको ती कारणे सांगता. मॅनेजमेंट किंवा अ‍ॅकेडमिक काउन्सिलवर असतो तर ताबडतोब कामे झाली असती. बाटली अन् पैसे तुमच्या समोर केल्याबरोबर कामे व्हायला लागतात. मी दीड महिन्यापूर्वी चौकशी करूनही पुन्हा तेच ते उत्तर दिले जाते. मला बाकीचे काही सांगू नका. ताबडतोब माझे काम करा’, या शब्दात त्यांनी लिपिकांचा पानउतारा करताच संपूर्ण कक्ष अवाक्  झाले. त्यावेळी कोणीही वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी उपस्थित नव्हते. मात्र, वानखेडे आपल्याच भावना बोलत असल्याचे तेथील उपस्थित प्राध्यापकांना वाटत होते आणि दबक्या आवाजात ते इतरांनाही तसे समजावत होते. वानखेडे यांचे बोलणे प्रातिनिधीक स्वरूपाचे असून दोन दोन वर्षे शोधप्रबंधांचे काय होते, हे कळत नसल्याची प्रतिक्रिया त्या ठिकाणी उपस्थित सिंधू महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने दिली. तसेच मॉरिसचे एका वानखेडे याच्या बोलण्याचे समर्थन करीत त्यांना शांत होण्याचा सल्ला दिला.