सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये येत्या गुरुवारपासून (दि. २६) रसायनशास्त्र विषयाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी दिली. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी भाभा अणुसंशोधन केंद्र व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे शास्त्रज्ञ डॉ. रेहलन गुलशन राहणार आहेत. परिषदेमध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. वडगावकर, पी. पी. सिमेंट संस्थेचे डॉ. काळे, भारत कोथांप विद्यापीठ शिमागोचे डॉ. कुमारस्वामी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे डॉ. कुंभार आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. २७) होणाऱ्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विटा येथील बलवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे हे राहणार आहेत. तर, शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. एम. ए. अनुसे, शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष डॉ. जी. एन. मुळीक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
२१ वे शतक हे ज्ञाननिर्मिती व बौध्दिक संपदेचे शतक आहे. तद्अनुषंगाने ज्ञानाच्या विविध विद्याशास्त्रातील सहकार्यातून प्रवाही व सर्वसमावेशक ज्ञानाची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून या परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेचा फ्रंटर्स ऑफ रीसर्च इन केमिस्ट्री (एफआरसी) असा विषय आहे. त्या अनुषंगाने रसायनशास्त्र विषयातील संशोधनाची विशेष क्षेत्रे व आव्हाने याबद्दल तज्ज्ञ प्राध्यापक व संशोधक मार्गदर्शन करणार आहेत. पॉलिमर, पर्यावरण प्रदूषण, नॅनो तंत्रज्ञान, ग्रीन केमिस्ट्री, अपारंपारिक ऊर्जा स्रोत आदी विषयांशी संबंधित चर्चासत्रे व तरुण वैज्ञानिकांसाठी संशोधनपर पेपर व पोस्टर प्रेझेंटेशनचे सेशन आयोजित केले गेले आहे. विभागातील रसायनशास्त्र प्रेमींनी व संशोधक प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी केले आहे.