कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोराडी महाविद्यालयाचा गणित विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संयुक्त विद्यमाने ‘रिसेन्ट ट्रेन्डस् इन मॅथेमेटिकल सायन्सेस’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. टी.एम. करडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बबन तायवाडे, अधिष्ठाता डॉ. के.सी. देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे, राष्ट्रीय परिषदेच्या समन्वयक आणि गणित विभाग प्रमुख डॉ. नीता धावडे व्यासपीठावर उपस्थित होते.
उद्घाटन सत्राचे संचालन इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षां वैद्य यांनी केले. डॉ. टी.एम. करडे यांनी सृष्टीच्या निर्मितीपासून आजपर्यंत गणित सूत्रांमध्ये झालेले परिवर्तन आणि विकास तसेच त्यासंबंधीचे संशोधन यावर माहिती दिली. अध्यक्षीय भाषण डॉ. बबन तायवाडे यांनी केले. राष्ट्रीय परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल गणित विभागाचे त्यांनी विशेष कौतुक केले. शैक्षणिक गुणवत्तेसाठी अशाप्रकारच्या परिषदा आयोजित केल्या. गणित विषयातील संशोधन वृद्धीसाठी विद्यापीठातील पदव्युत्तर गणित विभाग निरंतर प्रयत्न करीत असल्याचे डॉ. के.सी. देशमुख यांनी सांगितले. परिषदेच्या समन्वयक डॉ. नीता धावडे यांनी प्रास्ताविक केले. बीज भाषणात बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रा. डॉ. शिवराज सिंग यांनी ‘अनिश्चितेत निर्णय प्रक्रिया’ या विषयाची मांडणी केली.
कार्यक्रमाचे दुसरे सत्र पुण्याच्या डिफेन्स इन्स्टिटय़ुट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचे सहाय्यक संचालक डॉ. आर.एन. प्रल्हाद यांचे ‘मॅथमेटिकल मॉडेलिंग इन डिफेन्स सायन्सेस’ या विषयावर तर कोलकात्यातील जाधवपूर विद्यापीठाच्या गणित विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. फारूक रहमान यांनी होमोटोपी परटुबेशन मेथड आदी विषयांवर व्याख्यान दिले. यावेळी प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले. राष्ट्रीय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमासे प्रमुख पाहुणे होते. डॉ. नीता धावडे यांनी परिषद अहवाल वाचन केले. आयोजन समितीचे सचिव ज्ञानेश्वर निकम यांनी आभार मानले.