केंद्र व राज्य शासनाचे वस्त्रोद्योग खाते व महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने शहरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना २० टक्के सूट दिली जात असल्याने विक्रीमध्ये वाढ झाली आहे. हे प्रदर्शन कस्तुरचंद पार्कवर दुपारी १२ ते रात्री ९ वाजेदरम्यान २ मार्चपर्यंत पाहता येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी दिली.
प्रदर्शनासाठी प्रवेश तसेच पार्किंग नि:शुल्क आहे. या प्रदर्शनासाठी यंदा प्रथमच विस्तीर्ण ५५ हजार चौरस फूट क्षेत्रात ६७ स्टॉल्स आहेत. देशभरातील ओरिसा, काश्मीर, पश्चिम बंगालसह बारा राज्यातील संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. हातमागावर तयार करण्यात आलेल्या साडी, चादरी, शाल, चादर, शर्ट्स, मफलर, टॉवेल्स आदी विविध वस्त्र प्रावरणे प्रदर्शनात विक्रीस उपलब्ध आहेत. ग्राहकांना खरेदीत २० टक्के सवलत दिली जात आहे. फूड झोन तसेच लहान मुलांसाठी खेळणी आहे. दोन वर्षांपूर्वी नागपुरात झालेल्या प्रदर्शनात ५ कोटी ३२ लाख रुपयांची विक्री झाली होती. ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद येथे आयोजित प्रदर्शनात ६ कोटी ३८ लाख रुपये विक्री झाली होती. यंदा रोज दहा ते वीस हजार लोक प्रदर्शनास भेट देण्याची तसेच १० कोटी रुपये विक्री होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या संस्कृती संवर्धनात हातमागाचे मोठे योगदान आहे. विविध संस्कृतीचे प्रतिबिंब हातमागावर विणलेल्या वस्त्रांमध्ये उमटलेले दिसते, असे राज्याच्या वस्त्रोद्योग संचालक आयपीएस अधिकारी रिचा बागला यांनी सांगितले. हातमाग विणकर गरीब असतात मात्र त्यांनी विणलेले हातमागावरील कापड वैभवशाली असते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विणकर तसेत ग्राहकांनाही सुवर्णसंधी मिळते. नागरिकांनी प्रदर्शनास आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन हातमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन.बी. डावर यांनी केले.