नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचे प्रकार, त्यांचे स्वरूप याविषयी माहिती देतानाच या आपत्तींचे व्यवस्थापन कशा प्रकारे होऊ शकते, याविषयी येथे गोदावरी शिक्षण मंडळ संचलीत जी. डी. सावंत महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारयोजनेतंर्गत भूगोल विभागातर्फे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात मंथन करण्यात आले.
‘आपत्ती व्यवस्थापन: काळाची गरज’ या विषयावर झालेल्या चर्चासत्राचे उद्घाटन प्रशांत वाघमारे यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. ए. बी. बोडके यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटनप्रसंगी गोदावरी शिक्षण मंडळाचे सचिव अशोक सावंत यांनी निसर्गाचा असमतोलपणा व लहरीपमा यामुळे निसर्गाचे चक्रच बदलले असून वेगवेगळ्या आपत्ती शेतकरी तसेच निसर्गातील सर्व घटकांवर येत असल्याचे नमूद केले. वेगवेगळ्या आपत्ती येत असल्यामुळे त्यांच्यावर विजय कसा मिळवायचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसहभागामुळे ते शक्य असल्याचा दिलासाही त्यांनी दिला. डॉ. एन. आर. कापडणीस यांनी आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे व्यवस्थापन का करावे लागते, आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज का बनली आहे असे प्रश्न उपस्थित केले. भूगोल विभाग प्रमुख आणि चर्चासत्राचे समन्वयक प्रा. सी. एस. गायकवाड यांनी चर्चासत्राचा प्रमुख हेतू कथन केला.
डॉ. प्रमोद हिरे यांनी ‘भूकंप व त्याचे व्यवस्थापन’ या विषयावर बोलताना विकसित आणि अविकसीत देशात आलेल्या आपत्तीचे उदाहरण देवून त्या देशात कोणकोणत्या उपाय योजना करण्यात आल्या हे स्पष्ट केले. भूकंप ही एक अशी आपत्ती आहे की तिचे व्यवस्थापन अद्याप करू शकलो नाहीत आणि करू शकेल की नाही याविषयी निश्चित अंदाजही मांडू शकत नाही. परंतु आपत्तीपूर्वीचे व्यवस्थापन शक्य नसले तरीही नैसर्गिक आपत्ती आल्यावर तिचे व्यवस्थापन लोकसहभागातून करू शकतो असे मत त्यांनी मांडले.
गोदावरी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बी. बी. चौरे यांनी अनिश्चित घटना किंवा निसर्गाविरोधी घडणाऱ्या घटना म्हणजे आपत्ती अशी व्याख्या करून आपत्तीचे व्यवस्थापन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे नमूद केले. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण विकसित आणि अविकसित देशातील घडामोडीचा तुलनात्मक आढावा घेवून आपण का आणि कुठे कमी पडतो, असे सांगितले.
चर्चासत्रात नाशिकसह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रा. के. एल. धवसे यांनी केले.