राष्ट्रीय शिक्षक संसद २०१४ प्रथमच नागपुरात २६ व २७ सप्टेंबरला आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते २६ सप्टेंबरला होणार आहे. ही संसद जी.एच. रायसोनी विद्यानिकेतन व जी.एच. रायसोनी अ‍ॅकॅडमी फॉर ह्य़ुमन एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणा रोडवरील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
आजच्या काळात शिक्षक प्रशिक्षण पद्धती व शिक्षण प्रणाली या दोन्ही क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत. माहिती, सूचना व तंत्रज्ञान क्षेत्रामुळे सुद्धा शिक्षकाची भूमिका बदलत आहे. या बदलात शिक्षणातील मूल्ये, नीतिमत्ता हरवलेली दिसत आहे व त्याचे दुष्परिणाम समाजात दिसत आहेत. म्हणूनच मूल्याधिष्ठित व शिक्षणकेंद्रित शिक्षण, चारित्र्यसंपन्न व नीतिमान विद्यार्थी कसा घडवता येईल अशाच इतर महत्त्वपूर्ण विषयांवर शिक्षक व तज्ज्ञांकडून विचार मंथन करण्यासाठी या संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन शिक्षक सांसदेला विविध विषयांवर मिळणार आहे. या संसदेत जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायसोनी समूहातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक शिक्षकांनी रायसोनी समूहाच्या किंग्ज वे, श्रद्धा हाऊस या मुख्य कार्यालयात किंवा अंबाझरी रोडवरील जी.एच. रायसोनी विद्यानिकेतन येथे संपर्क साधावा किंवा (manthanntp@raisoni.net, rvidya@raisoni.net) या संकेतस्थळावर नाव नोंदवता येईल.